Take immediate action on the license of Innovage Agriculture Minister Dattatreya Bharane
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात सोयाबीन बियाणे विक्रीत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इनोव्हेज १०८ या वाणाच्या बोगस बियाणे विक्री प्रकरणातील पार्श्व जेनेटिक्स इंडिया कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना केल्याने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्याना चांगलाच दणका बसला आहे.
अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा आटोपून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुढील प्रवासासाठी नांदेड विमानतळावर पोहोचले असता इनोव्हेज १०८ या सोयाबीन बियाणे प्रकरणी फसवणूक झालेले बालाजी हेंद्रे या शेतकऱ्याने त्यांची भेट घेतली. यावेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या पार्श्व जेनेटिक्स इंडिया कंपनी तसेच बालाजी कृषी सेवा केंद्राचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा आणि अहवालानुसार नुकसान भरपाई मिळावी अन्यथा मला आत्मदहन करावे लागेल, अशी तोंडी व लेखी मागणी यावेळी शेतकऱ्याने कृषिमंत्री भरणे यांच्याकडे केली.
यावेळी बाजूलाच असलेले जिल्हा कृषी अधिक्षक दत्तकुमार कळसाईत यांनी बोगस बियाणे विक्री प्रकरणी पार्श्व जेनेटिक्स इंडिया कंपनीच्या बियाणे विक्री परवाण्यावर कार्यवाहीसाठी राज्य कृषी विभागाच्या गुण नियंत्रण संचालकास पत्र पाठवले असून कालच याप्रकरणी पुणे येथे सुनावणी झाल्याचे कृषिमंत्री भरणे यांना अवगत करून दिले. परंतू त्यावर समाधानी न झालेल्या कृषीमंत्री भरणे यांनी संबंधित कंपनीच्या परवान्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्याचा अहवाल मला लवकरात लवकर कळवा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
इनोव्हेज १०८ बियाणे प्रकरणी गेली दोन ते अडीच महिने कंपनीकडे गार्डनमुना उपलब्ध नव्हता. परंतु ऐनवेळी सुनावणीच्या दरम्यान संबंधित कंपनीने गार्ड नमुना सादर केल्याचे एका अधिकऱ्याकडून समजले. आजपर्यंत बियाणाचा गार्ड नमुना उपलब्ध नसताना परवाना रद्द होण्याच्या भीतीने तो आत्ता सादर करण्यात येतो. म्हणजे यामागे मोठे षडयंत्र असून कृषी अधिकारी, बियाणे कंपन्यांचे अधिकारी व बोगस बियाणे विक्रीतील दुकानदार यांचे कॉल डिटेल्स तपासून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. बालाजी हेंद्रे, नांदेड (फसवणूक झालेले शेतकरी)
"सोयाबीनच्या बोगस बियाणे विक्री प्रकरणातील संबंधित कंपनीच्या परवान्यावर तात्काळ कार्यवाही करा तरच राज्यात कुणी यापुढे बोगस बियाणे विक्री करण्याचे धाडस करणार नाही."- दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री