Takarala accident Pudhari
नांदेड

Takarala accident: टाकराळा बु. येथे भीषण अपघात; जिप्सीला मागून धडक, 10 जण गंभीर जखमी

हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा बु. बसस्टॉपजवळ सायंकाळी सुमारे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला

पुढारी वृत्तसेवा

हिमायतनगर : तालुक्यातील टाकराळा बु. बसस्टॉपजवळ सायंकाळी सुमारे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला. विवाह सोहळा आटोपून दरेगावकडे परतणाऱ्या जिप्सी टेम्पोला वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून जोरदार धडक दिल्याने 10 जण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील एकाच कुटुंबातील सदस्य आंध्र प्रदेशातील निर्मल येथे विवाहासाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर टाकराळा बु. येथे त्यांच्या जिप्सी टेम्पोला मागून येणाऱ्या वीट भरलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर जिप्सी पलटी झाली. धडक देणाऱ्या टेम्पो चालकाने वेळीच ब्रेक न लावल्याने वाहन सुमारे 40 ते 50 फूट फरफटत गेले, त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढली.

या अपघातात महिलांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून एकूण 15 प्रवाशांपैकी 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक युवकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना भोकर येथील स्पंदन रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर चार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महामार्गावर बेफिकीरपणे धावणाऱ्या वीट वाहतूक वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांनी अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT