नरसीत भिलवंडे परिवारातील आजी-माजी सरपंच समर्थकांची भरचौकात हाणामारी  File Photo
नांदेड

Nanded Crime : नरसीत भिलवंडे परिवारातील आजी-माजी सरपंच समर्थकांची भरचौकात हाणामारी

दोन्ही घटनांत 12 जणांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नायगाव तालुक्यातील नरसी परिसरात जुन्या व किरकोळ कारणांवरून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुकानात घुसून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे प्रकार घडले आहेत. या दोन्ही प्रकरणांत एकूण 12 जणांविरुद्ध रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना 11 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता नरसी चौक परिसरात घडली. फिर्यादी रवींद्र शिवाजी भिलवंडे (वय 47, रा. नरसी) हे किराणा दुकानासमोर उभे असताना आरोपींनी किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर दुकानात घुसून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी,गजेंद्र, नारायण, मंगेश,संदेश, सुमित व केदार भिलवंडे (सर्व रा. नरसी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 323, 504, 506 तसेच बीएनएस कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसरी घटना दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता नरसी येथील हार्डवेअर दुकानात घडली. फिर्यादी गजेंद्र पांडुरंग भिलवंडे (वय 45) यांच्या दुकानात आरोपींनी प्रवेश करून पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून गोंधळ घालत शिवीगाळ व मारहाण केली. लाकडी दांडक्याने संदेश, मंगेश, सुमित व केदार यांना मारहाण करण्यात आली, तर भांडण सोडविण्यास आलेल्या नारायण यांच्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

तसेच फिर्यादी व साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी संभाजी हणमंत भिलवंडे, बालाजी हणमंत, रवींद्र, सुधाकर, गजानन व हेमंत रवींद्र भिलवंडे (सर्व रा. नरसी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा क्रमांक 21/2026 दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास सहाय्यक फौजदार व सपोनि व्ही. एच. हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलिस करीत असून नरसी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT