नांदेड : शहरातील बहुचर्चित सोनू कल्याणकर हत्याकांडाचा छडा लावण्यात भाग्यनगर पोलिसांना यश आले असून, सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने तीन आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस चकमकीत आरोपी जखमी
सोनूच्या हत्येनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहा तासांत तिघांना अटक केली. मात्र, चौथा आरोपी अंकुश गंधमवाड हा झरी खदानीकडे पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी गंधमवाड याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार (फायरिंग) केला. स्वसंरक्षणार्थ पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी प्रत्युत्तरादाखल झाडलेल्या गोळीत गंधमवाड जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनासह पोलिसांवरील हल्ल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
सोनूचे वडील अशोक कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हे हत्याकांड प्रेमप्रकरण आणि विवाह मोडल्याच्या रागातून झाले आहे. मुख्य संशयित मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे याने २०२१ मध्येही सोनूवर हल्ला केला होता. गोलू सध्या बिल्डर संजय बियाणी खून प्रकरणात जेलमध्ये आहे. जेलमध्ये असूनही त्याच्या साथीदारांनी नवरात्रीपासून सोनूशी वाद घातला होता आणि सोमवार पहाटे पाळत ठेवून त्याचा काटा काढला.
सहा जणांवर गुन्हा; एक फरार
या प्रकरणात मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, चंद्रविजय मंगनाळे, रोहित लोट, प्रशांत शिंदे, अंकुश गंधमवाड आणि कृष्णा जोगदंड अशा सहा जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील चार जण अटकेत असून चंद्रविजय मंगनाळे फरार आहे. सलग पाच खुनांच्या घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण असल्याने पोलिसांनी आता शहरात गस्त आणि बंदोबस्त वाढवला आहे.