Ratoli village snake in temple
नायगाव : रातोळी (ता. नायगाव) येथील इच्छापूर्ती महादेव मंदिरातील पिंडीवर अशिल नागराजांचे थेट दर्शन झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. गावातील मन्याड नदीकाठी वसलेल्या या प्राचीन मंदिरात घडलेली घटना अचंबित करणारी असून स्थानिकांसह भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मंदिरातील पिंडीवर सकाळच्या पूजेसाठी पुजारी व दर्शना साठी संदीप पाटील आणि अन्य भाविक आले असता त्यांनी पिंडीला वेढा घातल्यासारखे भासत असलेले नागराज पाहिले. ही बाब लक्षात येताच काही क्षणांतच ही माहिती गावभर पसरली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाविक मंदिराकडे धाव घेऊन दर्शन घेत होते.
नायगाव तालुक्याच्या हद्दीतील रातोळी गावातील हे इच्छापूर्ती महादेव मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मनोभावे नवस केल्यास तो पूर्ण होतो, असा भाविकांचा समज असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भक्तांची ये-जा असते. विशेषतः महादेवनगर, रातोळी, नायगाव परिसरातील लोक या मंदिरावर दृढ श्रद्धा ठेवतात.
नागराजांच्या दर्शनामुळे भाविकांची दिवसभर मोठी गर्दी होती. काहींनी याला देवाचा संकेत तर काहींनी शुभ शकुन मानत मंदिरात विशेष पूजा, अभिषेक करण्यास सुरुवात केली. मंदिर व्यवस्थापकांनी मात्र भाविकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून या घटनेचे स्वरूप नैसर्गिक असू शकते, असे सांगितले.
मन्याड नदीच्या पश्चिम काठावर शांत परिसरात वसलेले हे मंदिर निसर्गरम्य वातावरणामुळे प्रसिद्ध आहे. करुणामय महादेवाच्या पिंडीवर अशा प्रकारे नागराजांचे दर्शन हे अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर रातोळी परिसरात दिवसभर चर्चांना ऊत आला आहे. मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी योग्य रांग व्यवस्था केली असून सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलीस यंत्रणा देखील दक्ष आहे.