माहूरगडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू File Photo
नांदेड

Sharadiya Navratri 2025 : माहूरगडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन, स्वयंसेवी संस्थांकडून तयारी

पुढारी वृत्तसेवा

Sharadiya Navratri festival begins at Mahurgad from today

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ असलेल्या माहूरगडावर शारदीय नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या नवरात्र महोत्सवासाठी माहूरगड परिसर सज्ज झाला असून, भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी प्रशासन, पोलीस विभाग, मंदिर संस्थान तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत असते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक गडावर दाखल होणार असल्याने सुरक्षेपासून ते सुविधा व्यवस्थेपर्यंत सर्वच बाबींमध्ये काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी दर्शनी रांगेची व्यवस्थित सोय करण्यात आली आहे. दर्शन रांगांमध्ये भाविकांना अडचण येऊ नये याकरिता स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यामुळे सुरक्षा व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, भगवान परशुराम मंदिर परिसरात अन्नदानाची व्यवस्था देखील दररोज केली जाणार आहे. ही सर्व सुविधा भाविकांना उत्सव काळात उपलब्ध होणार आहे.

याशिवाय परिसरात आरोग्य

सुविधा, आपत्कालीन वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, पोलीस बंदोबस्त अशा सर्व यंत्रणा सतत तत्पर राहणार आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेतही विशेष बदल करण्यात आले असून, शहरातील प्रमुख चौकांवर वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. येत्या दहा दिवसांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभभाविकांना घेता येणार आहे. गड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, देवी रेणुकेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने नवरात्रोत्सवाचे सोहळे संपन्न होणार आहे.

भाविकांच्या सोयी-सुविधा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. नवरात्र महोत्सव काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. भाविकांच्या सेवेसाठी माहूरगड सज्ज झाला असून, नवरात्रोत्सव भाविकांसाठी एक आनंददायी व संस्मरणीय ठरणार आहे.
-अभिजीत जगताप, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष रेणुका देवी संस्थान माहूर.
गडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून भाविकांच्या सोयीसाठी माहूर टी पॉइंट येथून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र काळात गडावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षेसाठी आवश्यक बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण तसेच इतर सर्व उपाययोजना काटेकोर-पणे राबविण्यात येतील.
-गणेश कराड, पोलिस निरीक्षक माहूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT