Shaktipeeth Highway Dispute  pudhari photo
नांदेड

Shaktipeeth Highway Dispute | शक्तिपीठातून मुक्ती झाल्याबद्दल खा. चव्हाणांच्या सत्काराचा घाट !

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावे वगळली

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी नांदेड : नागपूर ते गोवा ह्या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीतून नांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावे वगळण्यात आली आहेत. त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी एकजुटीने व्यापक आंदोलन केले; पण नांदेड जिल्ह्याला 'शक्तिपीठमुक्ती' मिळवून दिल्याबद्दल आता केवळ खा. अशोक चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरील महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यासंबंधीचा शासन आदेश चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तारखेला (१ एप्रिल) जारी झाला. या आदेशात कोणती गावे वगळली गेली व नव्याने कोणती गावे समाविष्ट झाली, याचा तपशील नव्हता; पण आता संपूर्ण तपशील समोर आला असून त्यानुसार नदिडच्या हदगाव व अर्धापूर तालुक्यातील बहुतांश गावांना नव्या आखणीत वगळण्यात आले आहे. आखाडा बाळापूर येथूनच या महामार्गाला वेगळे वळण देण्यात आले आहे. मागील दोन-अडीच वर्षे या महामार्गाविरुद्ध नांदेड जिल्ह्यात शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने करून ह्या अनावश्यक महामार्गासाठी बागायती क्षेत्रातला बाधित करू नका, अशी मागणी सातत्याने केली. शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा नेते आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची एकदाही पाठराखण केली नाही.

नव्या आखणीमध्ये वरील गावे वगळल्याची माहिती समोर आल्यानंतर एका गटाने खा. चव्हाण यांच्या आभारासाठी सभा आणि सत्काराचा घाट घातला असून हा सोहळा पुढील काही दिवसांत होणार असल्याचे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या एका जवाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. अर्धापूर तालुका भोकर विधानसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. या भागावर चव्हाण परिवाराचा मोठा प्रभाव आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या आधीच्या आखणीवरून चव्हाण यांना प्रभावक्षेत्रातील मोठ्या रोषास तोंड द्यावे लागले होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा नांदेडसह अनेक मतदारसंघात पराभव होण्यामागे 'शक्तिपीठ मार्गाची जवरदस्ती' हे एक महत्त्वाचे कारण ठरले.

नंतरच्या काळात अशोक चव्हाण यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली भोकर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाला मिळवून दिली, तरी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्यावर मालेगाव-अर्धापूर पट्ट्यातील अनेक हितचिंतक, शेतकरी त्यांच्यावर नाराज होते; पण भाजपात स्थिरस्थावर झाल्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपल्या मतदारसंघातील प्रभावित भाग शक्तिपीठमधून वगळण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली.

आता या महामार्गविरोधी कृती समितीतील काही प्रमुख तसेच अन्य हितचिंतकांनी अर्धापूर परिसरात आपल्या नेत्याच्या सत्कार समारंभाची जुळवाजुळव सुरू केल्याचे सांगण्यात आले. वरील हालचालींमध्ये खा. चव्हाण यांनी ज्यांच्याकडे अर्धापूर तालुक्याची जबाबदारी सोपविली, त्या किशोर मल्लिकार्जुन स्वामी यांचेही नाव समोर आले. वेगवेगळ्या गावांमध्ये सत्कार समारंभाची वातावरण निर्मिती सुरू झाली असल्याचेही सांगण्यात आले; पण स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता नियोजित समारंभाबद्दल आपल्यालाही काहीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक व अनाठायी असून तो वेगवेगळ्या जिल्ह्यांवर लादला जात आहे. या भूमिकेतून हा महामार्गच रद्द केला जावा, अशी मागणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सतत करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील कृती समितीची भूमिकाही अशीच होती; पण आता अर्धापूर तालुक्यातील सर्वच गावे वगळण्यात आल्यानंतर या समितीने आधी जी भूमिका घेतली होती ती कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका नेत्याच्या सत्काराचा घाट घातला जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेचे प्रल्हाद इंगोले यांनी त्यास आपला विरोध दर्शविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT