Water Crisis pudhari photo
नांदेड

Nanded News : दोन हजार लोकसंख्येच्‍या गावांत पाणीटंचाई

जलजीवन मिशनची कामे अर्धवट; ऐन पेरणीच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र येरावार

उमरी : तालुक्यातील जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेले कळगाव व कळगाव तांडा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ऐन पेरणीच्या दिवसात गावकऱ्यांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून गावात उभारण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे निकृष्ट व अर्धवट असल्याने जमिनीत पाणी असूनही पाणी समस्या निर्माण झाली आहे.

जल जीवन मिशनची अर्धवट असलेली कामे तत्काळ पूर्ण करून निर्माण झालेली पाणी समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त गावकऱ्यांनी दिला आहे.उमरीच्या उत्तर दिशेला असलेल्या कळगाव व कळगाव तांड्याची लोकसंख्या जवळपास एवढी आहे. सात ग्रामपंचायत सदस्य आहेत . जमिनीत भरपूर पाणी आहे. परंतु जलजीवन मिशन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची कामे गेल्या तीन वर्षापासून निकृष्ट व अर्धवट अवस्थेत असल्याने पाणी उशाला कोरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे.

जल जीवन मिशनची कामे अर्धवट असून ती निकृष्ट दर्जाची आहेत. या कामाचे बिल काढण्यात येऊ नये असे एक निवेदन समस्त गावकरी मंडळींच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आले. त्यांनीही कामाचा दर्जा न पाहता अर्धवट कामे आणि निकृष्ट दर्जाची कामे झाली असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांना कामाचे बिल काढले असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्‍यान, या संदर्भात असंख्य गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे. परंतु, मागील तीन वर्षापासून जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गावातील विहिरीला भरपूर पाणी आहे. परंतु पाईपलाईनची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची व अर्धवट अवस्थेत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीची खोली ६० फूट असताना देखील ४० फुटांची खोली करण्यात आली आहे.

या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊन देखील संबंधित अधिकारी काहीच कार्यवाही करीत नाहीत. निकृष्ट दर्जाची व अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी कामावर येत नसल्याने गुत्तेदारांची मनमानी वाढली आहे. अशा परिस्थितीत गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला जबाबदार कोण?. या सर्व कामाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT