नांदेड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. अनेक शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर माहिती गोळा केल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकार्यांची चांगलीच दमछाक झाली.
प्रत्येक शाळांमध्ये तसेच महाविद्यालयात सीसीटीव्ही, तक्रार पेटी ठेवणे, विद्यार्थिनीच्या अडीअडचणीच्या संदर्भात पालक - शिक्षक संघाची दर 15 दिवसाला बैठक घेणे, विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक शौचालय उभारणी, शाळा- महाविद्यालयात वाहनातून येणा-या बस चालकांची मादक पदार्थ व दारु सेवन विषयक चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनाची तपासणी संदर्भात परिवहन विभागाला स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. हे आदेश देताना राज्य सरकारने कोणत्याही निधीची मात्र तरतूद करण्याचे सौजन्य दाखविले नाही.
राज्य शासनाने हा सर्व खर्च शिक्षकांनी पदरमोड करून करावा, असा अलिखीत आदेश दिले. ज्या शाळांकडे आर्थिक सुबत्ता आहे. ज्या शाळा स्वयं अर्थसहाय्यीत आहेत. अशा शाळांनी तत्परतेने सीसीटीव्ही बसवले. पण त्यांची संख्या नगण्य आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या 2187 शाळांपैकी फक्त 201 शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत. 1504 खासगी शाळांपैकी 724 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यातील काही शाळांमधील कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.
अनेक शाळांमध्ये विशेषत ग्रामीण भागातील शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याने सीसीटीव्ही बसविण्यात अडचणी येत आहेत. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बसचालक यांची पोलीस यंत्रणेमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पण शिक्षण विभागाने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे.
पोलिसांकडून होणारी चारित्र्य पडताळणी झाली की नाही या संदर्भात शिक्षण विभागाला कोणतीही माहिती नाही, असे सांगण्यात आले. अनेक शाळांमध्ये तक्रार पेटी नसल्याने गैरप्रकार समोर येत नसल्याचे चित्र आहे.
प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 5 टक्के निधी देण्याची सूचना करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात हा निधी मिळालाच नाही. सुदैवाने नांदेड जिल्ह्यात अद्याप कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरीही भविष्यात कोणतीही अघटित घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या सूचनांचे पालन आवश्यक आहे, बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात राज्य शासनाने वेगवेगळे परिपत्रक जारी केले पण याची अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार या संदर्भात पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दूरवस्थेबाबत नायगावचे आ. राजेश पवार, भोकरच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. या आमदारद्वयाच्या तक्रारीनंतर सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
नांदेड जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत, शौचालयाची दुरवस्था आहे. काही शाळांमध्ये तर शौचालयच नाहीत. त्यामुळे विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. शिक्षण विभागातील अधिकार्यांना याची जाणीव असली तरीही ते कोणतीही धाडसी कारवाई करीत नाहीत, हे दुर्दैवी आहे. शासनाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.योगेश पांडे, पालक, नांदेड