Marathwada Graduate Election Result pudhari photo
नांदेड

Marathwada Graduate Election Result | पदवीधर निवडणूक : भाजपाचा उमेदवार असता, तर सोयीचे ठरले असते..!

सतीश चव्हाण यांच्या समर्थकांचे मत : गव्हाणे यांचा दावा खरा ठरला

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेडच्या अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला नांदेडसह लातूरचीही जागा गमवावी लागली होती. आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाची गत तशीच झाली आहे. मागील तीन निवडणुकांत भाजपाचा पराभव करणार्‍या सतीश चव्हाण यांना यावेळी या पक्षाची साथ होती; पण मतदारांतील काही समूहांनी ही साथ आणि त्यांची युती नाकारली.

२००८ पासून वरील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या सतीश चव्हाण यांनी मागील तीन निवडणुकांत भाजपा उमेदवारांचा सहज पराजय करून या मतदारसंघावर आपला वरचष्मा निर्माण केला होता. या निवडणुकीत त्यांच्यासोबत भाजपा आणि शिंदेसेनाही होती, तरी मतदानामध्ये त्याचा लाभ होण्याऐवजी त्यांना जबर फटका बसल्यानंतर निवडणुकीत भाजपाचा उमेदवार राहू दिला असता तर ते सोईचे ठरले असते, अशी भावना चव्हाण यांच्या येथील काही सहकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

मागील निवडणुकांत मागासवर्गीय, मुस्लीम या समूहातील मतदारांचे एकगठ्ठा मतदान भाजपाविरोधक म्हणून चव्हाण यांच्या बाजूने गेले होते; पण या निवडणुकीत ते भाजपाच्या साथीने उभे असल्याचे पाहून त्यांचा पारंपरिक मतदार त्यांच्यापासून दुरावला. त्यामुळे त्यांची पहिल्या पसंतीची दहा हजारांहून अधिक मते घटल्याचे सांगितले जात आहे.

मागील १८ वर्षांतील संबंध आणि संपर्कांतून सतीश चव्हाण यांची यंत्रणा आठही जिल्ह्यात कार्यरत होती. पक्षीय पातळीवरील वाटाघाटींत भाजपाने ही जागा ‘राष्ट्रवादी’ला सोडली. या पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी चव्हाण यांच्या प्रचारात सहभाग नोंदविला, तरी त्यांना त्याचा लाभ झाला नाही. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण व त्यांचा गट सक्रिय होता; पण भाजपाच्या एका आमदाराने शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सतीश चव्हाण यांच्यासाठी त्यांचे हितचिंतक, समर्थक सक्रिय झाले होते. मतदार नोंदणी तसेच बहुतांश मतदारांचे संपर्क क्रमांक संकलित करण्यात त्यांची यंत्रणा आघाडीवर दिसली. नंतर चव्हाण यांच्यासाठी भाजपाचे नेते-पदाधिकारीही सक्रिय झाले, तरी ‘पदवीधर’च्या यंदाच्या मतदारांत विशेषतः नवमतदारांत भाजपाबद्दल रोष पसरलेला होता, तो मतदानातून व्यक्त झाल्याचे ‘राष्ट्रवादी’च्या एका पदाधिकार्‍याने निकाल स्पष्ट होताच सांगितले.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे सतीश चव्हाणांच्या तुलनेत नवखे म्हणून गणले गेले. नांदेड जिल्ह्यात त्यांचा सर्वदूर संपर्क नव्हता. थोरल्या पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते सतीश चव्हाण यांच्याशी जोडले गेले होते, तरी प्रतापसिंह पाटील यांना नांदेड जिल्ह्यात चांगले पाठबळ मिळाल्याचे दिसून आले. आधी सतीश चव्हाण यांना मदत करण्याची भूमिका घेणारे काही संस्थाचालक शेवटी महाविकास आघाडीच्या बाजूने वळाले.

परभणीचे माजी आमदार विजय गव्हाणे हे प्रतापसिंह पाटील यांच्या निवडणूक नियोजनात आणि प्रचारात सक्रिय होते. निवडणूक प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये असताना गव्हाणे यांनी पाटील यांच्या विजयाचा दावा ठामपणे केला होता. तो सत्यात उतरला. मतदारांनी तब्बल १८ वर्षे चव्हाण यांचा अनुभव घेतला. त्यांना आता थांबविले पाहिजे, अशी एक धारणा सर्वत्र बघायला मिळाली. ४१ उमेदवारांपैकी अनेकांनी आम्हाला नाही तर नाही; पण सतीश चव्हाण यांना आता बसवा, अशी भूमिका उघडपणे मांडली. या बाबीचाही चव्हाणांच्या मतदानावर परिणाम झाला.

पवारांचा परिणाम

प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी त्यांचे समर्थक ठिकठिकाणी कार्यरत होते. ‘राष्ट्रवादी’ (शरद पवार) पक्षाच्या काही नेत्यांनी मराठवाडा विभागात दौरे केले. स्वतः शरद पवार यांनी ठिकठिकाणच्या संस्थाचालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून पाटील यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांच्या या मोहिमेचा मोठा परिणाम झाला. पाटील परिवाराचे मराठवाड्यात ठिकठिकाणी विविध राजकीय कुटुंबांशी नातेसंबंध निर्माण झाले असून या नातेसंबंधांचाही त्यांना निवडणुकीत मोठा फायदा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT