Sand worth one crore seized in three days
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू विक्री विरुद्ध विशेष मोहीम उघडली. पण वाळूमाफिया अजूनही आपले अवैध व्यवसाय बंद करण्यास तयार नाहीत. बुधवारी रात्री सिडको पोलिसांनी अक्षरशः गोदावरी नदीच्या पात्रात उड्या मारून पोहत जाऊन दोन वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या व २२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. गेल्या तीन दिवसांत तब्बल एक कोटीची वाळू जप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. पोलिसांनी या प्रकरणी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नांदेड लगतच्या सिडको, सोनखेड, लिंबगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा जप्त केला. दोन दिवसांपूर्वी लिंबगाव पोलिसांनी कोटीतीर्थ येथे सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करताना मोठा ऐवज जप्त केला.
माहूर पोलिसांनी अवैध रेतीवाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त केले. शहरालगतच्या सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुपूरी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण यांचे पथक घटनास्थळी धावले. वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने सापळा रचला. पोलीस आल्याचे लक्षात आल्यानंतर वाळूमाफियांनी पाण्यात उड्या मारल्या. पोलिसांनीही आरोपीही अटकेसाठी गोदावरी नदीच्या पानात उड्या मारल्या. व दोघांच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणी पांडुरंग महादराव हंबर्डे, अच्छेलाल गुलाबचंद राम या दोघांसह अन्य आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लशआऊट अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू किंवा गौण खनिजाचा उपसा होणार नाहीत, याबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायाविरुद्ध कारवाई सुरू आहे. यापुढेही सुरू राहील, सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नांदेड पोलिसांतर्फे सुरू असलेली कारवाई आता आणखी कठोर करण्यात येईल. वारंवार उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोक्कासारखे गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांनी अवैध वाळू उपसाबाबत नजीकच्या पोलिस ठाण्याला किंवा थेट जिल्हा पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा.