Illegal sand mining Pudhari
नांदेड

Illegal sand mining| इज्जतगावात वाळूमाफियांचा उच्छाद कायम

गोदावरी पात्राची लूट; महसूल प्रशासनाची संशयास्पद भूमिका

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : तालुक्यातील इज्जतगाव परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्याची धसकी घेतली जात असतानाही वाळूमाफिया निर्भयपणे यांत्रिक बोटीच्या सहाय्याने गेल्या चार दिवसांपासून सर्रास वाळू उपसा करीत आहेत. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवाढव्य यांत्रिक बोटींचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असून, ही वाळू रातोरात तालुक्यातील विविध गावांत पोहोचवली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा बेकायदेशीर धंदा महसूल विभागाच्या माहितीशिवाय चालू राहू शकतो का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिकांच्या मते, वाळूमाफियांना महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे तसेच तलाठ्यांचे मूक पाठबळ मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच इतक्या उघडपणे वाळू उपसा सुरू असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. गोदावरी नदीपात्रातील हा अनियंत्रित वाळू उपसा पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करीत आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत असून, भविष्यात पूरस्थिती, जलसंकट आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच विटभट्ट्यांमुळेही नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

दरम्यान, नागरिकांकडून वाळूमाफियांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी जोर धरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

महसूल प्रशासन गप्प का? तहसीलदारांची भूमिका संशयात

इज्जतगाव परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेला वाळू उपसा महसूल प्रशासनाच्या लक्षात येत नाही, हे आश्चर्यकारक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिक बोटींचा वापर होत असताना महसूल अधिकारी, तलाठी आणि संबंधित यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय का आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये तहसीलदारांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT