Sale of spurious soybean seeds
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र, पेरलेले बियाणे न उगवणे आणि प्रयोगशाळेच्या तपासणीत बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील बियाणे निरीक्षकांच्या तक्रारीवरून तब्बल सहा बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध विविध कलमांखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चालू खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी बियाणे निरीक्षकांनी ७५१ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेचा अहवाल आणि बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर तालुकास्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत बियाण्यांमध्ये गंभीर दोष आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
संबंधित कंपन्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (२) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवाडे यांनी दिली.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कृषी संचालक श्री. बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी सचिन कपाळे, अमोल पेकम आणि तालुका बियाणे निरीक्षकांनी केली आहे.
गुन्हे दाखल झालेल्या कंपन्या :
बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि. (गेवराई बाजार, जालना), पार्श्व जेनेटिक्स इंडिया (पेटलावाड, मध्य प्रदेश), रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि. (इंदूर, मध्य प्रदेश), एस.के. बी. सीड्स प्रा. लि. (इंदूर, मध्य प्रदेश), एशियन सीड्स प्रा. लि. (इंदूर, मध्य प्रदेश), दप्तरी अॅग्रो प्रा. लि. (सेलू, वर्धा)