Sale of soybeans at a price lower than the guaranteed price, farmers Upset
संजय खंदारे
पांगरी : केंद्र सरकारने सोयाबीनचा हमी भाव ५ हजार ३२८ रुपये जाहीर केला असतानाच दुसरीकडे बाजार समितीमधे सोयाबीन ३ ते ४ हजार रुपये क्विंटलने विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांमधे नाराजीचा सूर दिसत आहे.
केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी जालना बाजार समीतीत सोयाबीन ३००० ते ४२०० पर्यंत भावाने खरेदी होताना दिसत आहे. हमीभाव आणि खरेदी भावात मोठा फरक पडल्याचे चित्र दिसत आहे. या मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या जालना मार्केटमध्ये सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. हमीभावापेक्षा कमी किमतीचे भावाने सोयाबीन खरेदी होत असल्यामुळे हमीभाव देण्याचा नेमका उद्देश काय आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कमी भावाने सोयाबीन खरेदी होत असेल तर हमीभाव ठरवण्याचा खटाटोप कशासाठी असा प्रश्नही शेतकरी विचारत आहेत.
एक एकर सोयाबीन पेरणीसाठी तीन हजार रुपयांचे बियाणे, दीड हजार रुपये नांगरणी, एक हजार रुपये रोटा, एक हजार रुपये पेरणी, दोन हजार रुपये खत, एक हजार रुपये आंतरमशागत, एक हजार रुपये फवारणी, चार हजार रुपये सोयाबीन काढणी, एकरी पाच क्विंटल उत्पादन झाल्यास साडे सात पायल्या सोयाबीन मशिनमधुन काढणारे घेतात. ते दोन हजार शंभर रुपयांचे होते.
सोयाबीनला एका एकरला १६हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर शेत दुरुस्ती चे पैसे वेगळे. सोयाबीन उत्पादन खर्च आणि उत्पादनातुन मिळालेले पैसे यांचा कुठेच ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस मेटाकुटीला येत आहे. त्याचा खर्चाचा आणि उत्पादनांचा ताळमेळ बसत नाही. त्यात उसनवारी, लग्न, दवाखाना, नैसर्गिक आपत्ती, सावकारी कर्ज यामध्ये शेतकरी पार होरपळून गेला आहे.
सोयाबीन किमान हमीभावाने तरी खरेदी करण्यात यावी नसता हमीभावाच्या आत जो व्यापारी सोयाबीन खरेदी करेल त्यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.