उमरखेड : नापिकी, दुष्काळ आणि वाढत्या आर्थिक विवंचनेने एका शेतकऱ्याचा जीव घेतला. घरातील कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर सणासुदीच्या दिवसांतही कुटुंबाच्या वाट्याला आलेले दुःख पाहून कोणाचेही मन हेलावून जावे, अशी परिस्थिती फुलसावंगी येथे आहे. या दुःखात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. ६) फुलसावंगी येथे जाऊन डोंगरे कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेतकरी जगजीवन डोंगरे यांनी नापिकी आणि दुष्काळाच्या संकटाला कंटाळून दि. २७ रोजी जीवन संपवले होते. घरचा कर्ता माणूस अचानक निघून गेल्याने डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याची वेळ असताना या कुटुंबाच्या घरात मात्र दुःखाचा काळोख पसरला आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी फुलसावंगी गाठले. डोंगरे कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत त्यांनी त्यांच्या दुःखात सहभागी होत आधार दिला. केवळ सांत्वनाचे शब्द न उच्चारता कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या दुःखात आपणही सहभागी असल्याचा भाव त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
शेतकऱ्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न अनुत्तरित
जगजीवन डोंगरे यांच्या आत्महत्येने नापिकी, दुष्काळ, शेतीचा वाढता खर्च आणि आर्थिक विवंचना यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसमोर उभ्या राहिलेल्या संकटाची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एका कुटुंबाचा आधार हरपल्याने मागे राहिलेल्या कुटुंबीयांचे भवितव्य काय, हा प्रश्नही या घटनेने ऐरणीवर आला आहे.
आमदार रोहित पवार हे महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करण्यासह उमरखेड येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘काळी दिवाळी’ कार्यक्रमासाठी आले होते. या दौऱ्यात त्यांनी फुलसावंगी येथे जाऊन डोंगरे कुटुंबाची भेट घेतली. संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, विधानसभा अध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, उमरखेडचे तालुकाध्यक्ष स्वप्नील अडकिने, उमरखेड तालुकाध्यक्ष स्वप्नील कनवाळे, भास्कर पंडागळे, प्रदीप पाटील देवसरकर, सोहेल चव्हाण, नाना इनामदार, मुक्तार पठाण, कृष्णा ईमडे, फिरोज लोढी, गोविंद इंगोले उपस्थित होते.
दिवाळीच्या दिव्यांऐवजी डोळ्यांत अश्रू...
सामान्यतः दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र डोंगरे कुटुंबासाठी यंदाची दिवाळी काळोख घेऊन आली. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कोणत्याही मदतीने भरून निघणारी नाही. अशा वेळी राजकीय नेत्याने औपचारिक सांत्वन न करता कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे, हा या भेटीचा भावनिक क्षण ठरला.