Railway Mobile Theft AI Photo
नांदेड

Railway Mobile Theft | उमरी–नांदेड–निजामाबाद लोहमार्गावर मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; रेल्वे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Nanded Nizamabad Train News

नरेंद्र येरावार
उमरी :
उमरी–नांदेड–निजामाबाद लोहमार्गावर धावणाऱ्या प्रवासी तसेच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत ‘ट्रॅव्हलिंग चोरट्या’ टोळ्या एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी सकाळी देवगिरी एक्स्प्रेसने उमरीकडे येत असताना डॉ. माधव शिंदे यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत नांदेड रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले. त्याआधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

रेल्वेतील चोरीच्या घटनांमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यानंतर दागिने आणि रोख रकमेची चोरी होत असल्याचे दिसून येते. नांदेड, मनमाड, भुसावळ, इगतपुरी, पुणे, सिकंदराबाद, तिरुपती, परळी वैजनाथ तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची वर्दळ वाढल्याने चोरट्यांना चोरीसाठी संधी मिळत आहे.

गाडीमध्ये चढताना-उतरताना होणारी गर्दी, ढकलाढकली आणि गोंधळाचा चोरटे फायदा घेतात. विशेषतः दाराजवळ उभे असलेले तसेच एकट्याने प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या निशाण्यावर असतात. गर्दीत मुद्दाम धक्का देऊन मोबाईल, पर्स किंवा अन्य मौल्यवान वस्तू लंपास करून गाडी सुटताच चोरटे दुसऱ्या डब्यात अथवा प्लॅटफॉर्मवरील गर्दीत पसार होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

या वाढत्या घटनांमुळे लोहमार्ग पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी विशेष गस्त वाढविणे, रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांची संख्या वाढविणे तसेच संशयास्पद व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना सुरक्षेबाबत सातत्याने सूचना देण्याची मागणी होत आहे.

‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’अंतर्गत रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे. नांदेड पोलिसांनी अलीकडेच चोरीचे मोबाईल जप्त करून संबंधित नागरिकांनी ओळख पटवून ते ताब्यात घेण्यासाठी तसेच चोरीच्या घटनांबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

उमरी–नांदेड–निजामाबाद मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि आरपीएफ व जीआरपीची गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT