नांदेड, पुढारी वृत्तसेवा देगलूर तालुक्यातील मेदनकाल्लर या गावांमध्ये आठ लोक पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते. दि. २७ ऑगस्टपासून निजामसागर धरणाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्याचा फटका देगलूर तालुक्यामधील तमलूर, मेदनकल्लर, उमर सांगवी या गावांना बसला. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून नांदेड जिल्हयात मुसळधार पाऊस सुरू आहे.
शुक्रवारी पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडकलेल्या सिद्धी आनवर देसाई, सिद्धी आसलम देसाई, सिद्धी मुक्रम देसाई, सिद्धी शाकीर सिद्धी मूनतान देसाई, पाशा देसाई, सिद्धी शरीफ देसाई, बागवानिन अमीन खान, मुमताज अमुजामी यांना सायंकाळी सहाच्या सुमारास सुरक्षितरित्या बाहेर काढले. यावेळी उपविभागीय अधिकारी देगलूर अनुप पाटील, तहसीलदार देगलूर भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आदी उपस्थित होते.
नांदेड : दि. २८ ऑगस्ट रोजी माऊली तालुका मुखेड येथील व्यक्ती मौला नबीसाब शेख हे मौजे बेटमोगरा या शिवारामध्ये अडकलेले होते. संबंधित व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदी करण्यासाठी आले होते. सायंकाळी माऊलीकडे जात असताना पुलावरून पाणी जात असल्याने त्यांनी एका शेडमध्ये आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.
संपूर्ण रात्र शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिमतीने तिथेच थांबले. ही गोष्ट स्थानिक प्रशासनाला समजली तेव्हा उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी तहसीलदार मुखेड यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार मुखेड यांनी स्थानिक नगरपालिका बचाव टीम आणि पोलीस निरीक्षक मुखेड त्या ठिकाणी पोहोचले. परंतु पाण्याचा प्रवास जास्त असल्याने संबंधित व्यक्तीला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधितव्यक्तीला राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत तात्काळ सुरक्षितस्थळी हलवण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने एसडीआरएफ टीमने देगलूर तालुक्यामधील मेदनकाल्लूर गावामधील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.