श्रीक्षेत्र माहूर : महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळपीठ असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून (दि.११) सुरूवात झाली. यावेळी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
वेद मंत्रांच्या जयघोषात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते आणि सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंदिरात सकाळी ११ वाजता घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी 'श्री' ला पारंपरिक अलंकार चढवून महाआरती करण्यात आली. या पूजाविधीचे पौरोहित्य वे. शा. सं. रवी काण्णव,अरविंद देव,अनिल काण्णव, भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले. घटस्थापनेच्या मंगल पर्वावर स्त्री शक्तीच्या पूजेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने अध्यक्ष वेदपाठक,सचिव दोन्तुला व कोषाध्यक्ष जगताप यांनी सपत्नीक कुमारिका व सुवासिनी पूजन केले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.
घटस्थापनेप्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर, बळीराजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर, त्यांच्याभोवती रेणुका कवच राहू दे, असे अध्यक्ष तथा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी रेणुकेला साकडे घातले. छबीना काढून परिसर देवता पूजन करण्यात आले. त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. त्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजाताई मुंडे, आ.भीमराव केराम व आ. संजय बांगर यांनी श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले.