नांदेड : चालू वर्षात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अनेक पिके हातातून गेली असता पीकविम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खा. रवींद्र चव्हाण यांच्या संसदेतील पिकविम्याच्या प्रश्न उपस्थित करण्याने दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खा. रवींद्र चव्हाण पोट निवडणूकीत विजयी झाल्यानंतर ता. १६ (सोमवार) रोजी पहिल्यांदाच संसदेत बोलण्यासाठी उभे राहिले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्यावर प्रश्न उपस्थित केल्याने योग्य लोकप्रतिनिधीची निवड केल्याच्या चर्चा नांदेड जिल्ह्यातील समाज माध्यमातून पाहावयास मिळाल्या. नांदेड जिल्ह्यातील एकूण पिकविम्याची रक्कम ६१७ कोटी रुपये असून त्यापैकी महाराष्ट्र सरकारने ३४९.७० कोटी रुपयांचा हिस्सा अदा केला असून केंद्र सरकारच्या वतीने भरावयाची २६७.३० कोटी रक्कम अजूनही वर्ग झाली नाही, असे नमूद करीत खा. रवींद्र चव्हाण लोकसभेत शेतकऱ्यांच्या पिकविम्यावर गरजले. संबंधित रक्कम तातडीने वर्ग करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याची आस असताना खा. रवींद्र चव्हाण संसदीय अधिवेशनात पहिल्यांदाच बोलण्यासाठी उभे राहिले असता शेतकऱ्यांच्या मुद्यालाच त्यांनी हात घातल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून स्वागत होत असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, प्रदेश काँग्रेस सचिव श्याम दरक, सुभाष किन्हाळकर, प्रताप देशमुख, संजय बेळगे, विठ्ठल पावडे, महेश देशमुख, प्रा संदीपकुमार देशमुख यांनी खा. रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले.
नांदेड जिल्ह्यातील पिकविम्या संदर्भात खा. रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत प्रश्न उपस्थित केला; आणि त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यातील समाज माध्यमात दिसून आले. खा. रवींद्र चव्हाण यांच्या दिल्लीतील प्रश्नाची चर्चा गल्लीत होत असताना दिल्लीत वजन असणाऱ्या नेत्यांकडूनही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न, त्यासंदर्भातील अपेक्षित कायद्याचा प्रश्न कधी उपस्थित होणार ? अशी मिश्किल प्रतिक्रिया निर्भय बनोचे प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी दिली!