Raid on a brothel in Nanded; two women rescued
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाईक नगर परिस-रातील एका खाजगी घरात छुप्या मार्गाने चालवल्या जाणाऱ्या कुंटण-खान्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, रोख रक्कमेसह सुमारे १ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांच्या सूचनेनुसार शहरात अनैतिक मानवी व्यापारास आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, आनंदनगर ते शोभानगर रस्त्यावरील नाईक नगर चौक येथील एका घरात बळजबरीने वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांना मिळाली होती.
पोलिसांनी पंचासमक्ष एका सामाजिक कार्यकर्त्याला 'बोगस गिऱ्हाईक' म्हणून पाठवले. सौदा निश्चित होताच इशारा मिळताच पोलीस पथकाने धाड टाकली. या कारवाईत आरती विकेश सोनकांबळे (वय ३५, रा. गणेशनगर वाय पॉईंट, नांदेड) आणि प्रताप संभाजी गायकवाड (वय १९, रा. हतनी, ता. उमरी, ह.मु. राजनगर, नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले, तर बाजीराव ताटे (रा. राजनगर, नांदेड) हा आरोपी फरार झाला आहे. पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात उघड झाले.