Rabi area will increase in Loha taluka
अहमद शेख
लोहा : लोहा तालुक्यात चालू वर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र लक्षणीय वाढणार आहे. २०२५-२६ या हंगामात तालुक्यात एकूण १४ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी क्षेत्रात वाढ झाल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी सांगितले.
तालुक्यातील काही भाग गोदावरी नदीच्या काठावर तर काही लिंबोटी धरणाच्या परिसरात असल्याने रब्बी पिकासाठी पोषक भौगोलिक परिस्थिती उपलब्ध आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल, साठवण तलाव आणि शेततळ्यात मुबलक पाणी साठले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.
रब्बी पिकांच्या अंदाजपत्रकासाठी संबंधित गावातील सहायक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि 'एसएमए' यांच्या माध्यमातून प्राप्त माहितीच्या आधारे आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहितीही कासराळे यांनी दिली.
"लोहा तालुक्यात गेल्या ४३ वर्षांत एवढा पाऊस कधीच झाला नव्हता, त्यामुळे सध्या नदी-नाले तुडुंब भरले असून जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. याच कारणामुळे यंदा तालुक्यात रब्बी क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे,"प्रशांत कासराळे, तालुका कृषी अधिकारी लोहा