प्रशांत भागवत
उमरखेड : कधी काळी मनातील भावना कागदावर उतरवून त्या पत्राच्या रूपाने आपल्या माणसापर्यंत पोहोचविण्याची घाई असायची. पत्र लिहिले की ते लिफाफ्यात बंद करून टपाल पेटीत टाकायचे आणि मग सुरू व्हायची आपल्या माणसाच्या उत्तराची आतुरतेने प्रतीक्षा. आज मात्र मोबाईलच्या एका क्लिकवर क्षणात संदेश पोहोचतो; पंरतु त्या संदेशामागची प्रतीक्षा, पत्रातील आपुलकी आणि स्वतःच्या अक्षरातून व्यक्त होणाऱ्या भावना काळाच्या ओघात हरवून गेल्या आहेत. उमरखेड तहसील कार्यालयासमोरील वडाच्या झाडाला लटकलेल्या जुन्या टपाल पेट्या या हरवलेल्या पत्रविश्वाची मूक साक्ष देत आहेत.
तहसील कार्यालयासमोरील वडाच्या झाडाला दोन जुन्या टपाल पेट्या आजही लटकलेल्या अवस्थेत दिसतात. लोखंडाला गंज चढला आहे, रंग उडाला आहे आणि काळाच्या झळांनी त्यांचे रूप पार बदलून गेले आहे. मात्र या जीर्ण पेट्यांकडे पाहिले की जुन्या पिढीच्या अनेक आठवणी जाग्या होतात. आज ही शहरातील जुन्या गावासह विविध भागांतही अशा टपाल पेट्या कुठे झाडांना, तर कुठे विजेच्या खांबांना मुख्य चौकात , लटकलेल्या अवस्थेत दिसून येतात.
एकेकाळी टपाल पेटी ही केवळ लोखंडाची पेटी नव्हती, तर ती माणसांच्या भावनांची वाहक होती. नोकरीसाठी दूर गेलेल्या मुलाचे पत्र, माहेरी गेलेल्या मुलीची खुशाली, सैनिकाच्या घरी आलेले पत्र, नातेवाइकांचे निमंत्रण, प्रेमाची कबुली किंवा दुःखद बातमी या पेट्यांमधून कागदाच्या छोट्याशा तुकड्यावर माणसांच्या आयुष्याचा मोठा भावनिक प्रवास सुरू व्हायचा.
पत्र लिहिण्याचीही एक वेगळीच पद्धत होती. शब्द जपून लिहिले जायचे. कागदावर उमटलेले अक्षर म्हणजे त्या व्यक्तीचा जिवंत स्पर्श वाटायचा. पत्र टपाल पेटीत टाकल्यानंतर ते कधी पोहोचेल, समोरच्याचे उत्तर कधी येईल, याची दिवसेंदिवस वाट पाहिली जायची. पोष्टमन दिसला की, घरातील प्रत्येकाची नजर त्याच्याकडे वळायची. आजच्या ‘क्षणात संदेश’ देणाऱ्या युगात त्या प्रतीक्षेची किंमत कदाचित जाणवत नाही.
मोबाईल, इंटरनेट, ई-मेल, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियामुळे संवादाचे जग आमूलाग्र बदलले आहे. अंतर कमी झाले, वेळ वाचला आणि संदेश पाठविण्याचा वेग कल्पनेपलीकडे वाढला. मात्र या वेगाच्या प्रवासात पत्रातील जिव्हाळा, हस्ताक्षरातील आपलेपणा आणि उत्तराची वाट पाहण्याचा आनंद कुठेतरी मागे पडला.
आठवणींच्या पेट्या की वापरात असलेली व्यवस्था?
उमरखेड शहरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या या जुन्या टपाल पेट्यांची सद्यस्थिती काय आहे, त्या नियमितपणे वापरात आहेत का, त्यातून अद्याप टपाल संकलित केले जाते का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. काही पेट्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्या केवळ जुन्या काळाच्या आठवणी म्हणून उभ्या असल्याचे चित्र दिसते. टपाल विभागाने शहरातील अशा पेट्यांची पाहणी करून वापरात असलेल्या आणि कालबाह्य झालेल्या पेट्यांची माहिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आज तहसील कार्यालयासमोरील वडाच्या झाडाला लटकलेल्या या दोन पेट्या शांत आहेत. त्यांच्यात अनेक वर्षापासून पत्रे ही टाकली जात नाहीत. पण त्या उमरखेडच्या एका जुन्या काळाची कहाणी सांगत आहेत. एका बाजूला हातातील स्मार्टफोनवर क्षणात येणारे संदेश आणि दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षांच्या उन्हा-पावसात उभ्या असलेल्या या टपाल पेट्या... संवादाच्या बदललेल्या प्रवासाचे हे अनोखे चित्र आहे.