Poor management in national highway work exposed
हिमायतनगर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांची कामे ठेकेदाराने मागील तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवली होती. यामुळे अतिवृष्टीच्या काळात वार्ड क्रमांक ४ व १६ मधील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झाले सध्या नाल्याचे काम सुरू असुन नालीचे बांधकाम इस्टीमेट मध्ये पाच फूट असुन केवळ तिन फूटाचे थातुरमातुर काम करत असल्याने संतापाची लाट पसरली असून ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बोगस काम सुरू आहे.
नुवाढत्या लोकक्षोभानंतर ठेकेदाराला नालीकाम सुरू करावे लागले असले तरी या कामातही पुन्हा निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नेहरूनगर, मूर्तजानगर आणि शहरातील जागरूक नागरिकांनी कामाची पाहणी केली असता त्यांना ठेकेदाराचा गलथानपणा स्पष्टपणे जाणवला. त्यांनी संबंधित अभियंत्याला जाब विचारला; मात्र अभियंत्याने नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत कामाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांचे आरोप आहेत की अभियंत्याच्या छत्रछायेखालीच ठेकेदार मनमानी करत आहे, आणि अशी परिस्थिती कायम राहिल्यास आगामी येणाऱ्या पावसाळ्यात हिमायतनगर शहराला पुन्हा पुरस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. अर्धवट ठेवलेल्या कामामुळे शहरातील शेकडो कुटुंबांना नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे धोका निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील विकासप्रेमी नागरिकांनी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
ठेकेदार व एजन्सीला काळ्या यादीत टाकणे, नाल्यांच्या आणि महामार्गाच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी, उड्डाण पुलाचे काम प्रलंबित ठेवल्याबद्दल फौजदारी कारवाई, नुकसानग्रस्त नागरिकांना योग्य तो दिलासा द्यावा. अनेक वर्षे सहन केलेल्या या गैरव्यवहाराला कंटाळा आला असून, शासनाने तातडीने पावले उचलून शहराला होणाऱ्या संभाव्य आपत्तीपासून वाचवावे, आणि शहरातील राखडलेल्या उड्डाणं पुलाचे काम मार्गी लाऊन होत असलेल्या दोन्ही बाजूच्या नाल्याचे काम दर्जेदार करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.