Sex Racket Busted : तीन लॉजवर पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश file photo
नांदेड

Sex Racket Busted : तीन लॉजवर पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कंधार उपविभागाची कारवाई; लॉज चालकांसह १० जणांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

Police Raid Three Lodges; Sex Racket Busted

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हा पोलीस दलाने अवैध व्यवसायांविरुद्ध पुकारलेल्या ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत लोहा शहरात एक अत्यंत मोठी कारवाई केली आहे. लोहा ते नांदेड रोडवरील तीन लॉजेसवर एकाच वेळी धडक छापे टाकून पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या मुख्य लॉज मालकासह, विनापरवाना दारू पिणारे ग्राहक आणि नियम पायदळी तुडवणाऱ्या इतर दोन लॉजच्या मॅनेजर व मालकांवर, अशा एकूण १० आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्हाभरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

निलय लॉजमध्ये चालत होता देहव्यापार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कंधार उपविभागाच्या पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी (दि. १६) लोहा शहरातील निलय लॉजवर अचानक छापा टाकत. पोलिसांनी पंचांसमक्ष लॉजची तपासणी केली असता, तिथल्या तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन पीडित महिला आढळून आल्या. त्यांची सखोल चौकशी केली असता, लॉज मालक रामकिसन विठ्ठलराव ढगे (वय ४७) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

निलय लॉजमध्ये वेश्याव्यवसायासोबतच अवैध दारूची मेजवानीही सुरू असल्याचे आढळून आले. काउंटरच्या बाजूला पाच इसम खुलेआम दारू पिताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३,७१० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत विनायक जाधव यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलय लॉजवरील कारवाईनंतर पोलिसांनी आपला मोर्चा शहरातील रणबीर लॉज आणि आर्या लॉज कडे वळवला. या दोन्ही लॉजेसची तपासणी केली असता, तिथे शासनाचे नियम पूर्णपणे पायदळी तुडवल्याचे दिसून आले लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आली नव्हती, तसेच त्यांचे ओळखपत्र किंवा पत्त्याची कोणतीही खातरजमा न करता त्यांना रूम भाड्याने देण्यात आल्या होत्या.

या गंभीर निष्काळजीपणाबद्दल रणबीर लॉजचे मालक बालाजी सदाशीव जाधव (रा. डोंगरगाव) व मॅनेजर रफिक अमिर शेख (रा. खांबेगाव) यांच्याविरुद्ध गु.र.नं. १७३/२०२६ नुसार, तर आर्या लॉजचे मालक अजय मारोती भिसे व मॅनेजर माधव गणेश कंधारे यांच्याविरुद्ध गु.र.नं. १७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ व ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

यांच्यावर झाले गुन्हे दाखल

या प्रकरणात रामकिसन विठ्ठलराव ढगे (वय ४७, लॉज मालक निलय लॉज), गुलाब रशीद शेख (वय ३७, रा. सायाळरोड, लोहा), सोमनाथ गंगाधर जंगले (वय ३३, रा. सायाळरोड, लोहा), बालाजी दत्ता जाधव (वय ३४, रा. सायाळरोड, लोहा), आनंद प्रकाश श्रीमंगले (वय ३२, रा. सायाळरोड, लोहा), शिलानंद कमलाकर वारकरे (वय ३२, रा. आंबेडकरनगर, लोहा), बालाजी सदाशीव जाधव (मालक, रणबीर लॉज), रफिक अमिर शेख (मॅनेजर, रणबीर लॉज), अजय मारोती भिसे (मालक, आर्या लॉज), माधव गणेश कंधारे (मॅनेजर, आर्या लॉज) अशा १० आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्तव्यदक्ष पोलिस पथक

सदर धडक कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या धाडसी कारवाईत पो.नि. चंद्रकांत जाधव, पो.नि. एन. एस. आयलाने, सोपनि केदार, पोउपनि संतोष पाटील, पोउपनि स्नेहा पिंपरखेडे, महिला पोलीस अंमलदार चोपवाड, श्रीमंगले, सुप्रिया मगर, श्रीदेवी मारवाडे, सविता जोंधळे, पुनम बेटकर तसेच सहा.पो.उप.निरी. किरपणे, पोहवा. सदाशिव गित्ते, नारायण कदम, अंमलदार कैलास गिरे, सतीष बलुरे, अतुल क्षीरसागर, घोरबांड, शिवाजी चौकटे आणि साजीद शेख यांनी चोख भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT