उमरखेड : शहरातील पुसद रोडवरील फ्रेंड्स सोशल अँड स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छापा टाकून सात जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रकमेसह जुगारासाठी वापरण्यात येणारी कॉइन्स, चार मोबाईल, तीन मोटारसायकली आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ७१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुसद रोडवरील फ्रेंड्स सोशल अँड स्पोर्ट्स क्लबमध्ये काही जण गोलाकार टेबलाभोवती बसून ५०, १००, २००, ५००, १ हजार आणि २ हजार रुपये दर्शनी किमतीच्या कॉइन्सचा वापर करून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत सुनील विश्वनाथ उदावंत (वय ५९, रा., सरदार पटेल वॉर्ड), फिरोज खान आजाद खान पठाण (वय ६०, रा. झाकीर हुसेन वॉर्ड), सुनील भिकू जाधव (वय ३८, रा. चुरमुरा), इनायत उल्ला खान (वय ५४, रा. तातारशाह वॉर्ड), शेख अयाज शेख आयुब (वय ३६, रा. झाकीर हुसेन वॉर्ड) आणि शेख वसीम शेख जलील (वय २२, रा. दयानंद कॉलनी, उमरखेड) यांच्यासह सात जणांना पकडण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून ७१ हजार ४७० रुपये रोख, २५२ जुगाराचे कॉइन्स, अंदाजे ६५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, अंदाजे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली, ४८ कॅट आणि ५२ गंजी पत्ते असा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमर खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३३ (एक्स) व १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमर खिल्लारे करीत आहेत.