Nanded Police Raid : नरसी येथील दोन लॉजवर पोलिसांचा एकाचवेळी छापा File Photo
नांदेड

Nanded Police Raid : नरसी येथील दोन लॉजवर पोलिसांचा एकाचवेळी छापा

देहव्यापाराचा भंडाफोड; ७ महिलांची सुटका, १० जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Police conduct simultaneous raids on two lodges in Narsi

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नरसी येथील बसस्थानकासमोरील दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर नांदेड पोलिसांनी शनिवारी (दि. २५) नियोजनबद्ध कारवाई करत मोठा भांडाफोड केला. स्थानिक गुन्हे शाखा, रामतीर्थ पोलीस ठाणे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या संयुक्त पथकाने एकाचवेळी टाकलेल्या धाडीत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी लॉज मालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिल्यानंतर ही धडक मोहीम राबविण्यात आली. बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी स्थानिक माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी या दोन्ही लॉजमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून कथितरीत्या देहव्यापार करून घेतला जात होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी दोन सामाजिक कार्यकर्त्यांना बोगस ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्याचा इशारा मिळताच पोलिसांच्या पथकाने दोन्ही लॉजवर एकाचवेळी धाड टाकून संबंधितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच नांदेड जिल्हा व पश्चिम बंगाल येथील सात महिलांची सुटका करून त्यांना संरक्षण व पुनर्वसनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.. महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT