Painganga 
नांदेड

Painganga barrage 90 percent completed | पैनगंगा बंधाऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण; किनवट-उमरखेडच्या सीमावर्ती गावांना मोठा दिलासा

१५ दिवसांत उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन; परतीच्या पावसात पाणी अडविण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : किनवट शहरासह उमरखेड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पैनगंगा नदीवरील नवनिर्मित उच्च पातळी बंधाऱ्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परतीचा पाऊस झाल्यास बंधाऱ्याला गेट बसवून पाणी अडविण्याची तयारी करण्यात येणार आहे. त्यामुळे किनवट-उमरखेड या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या गावांसह पैनगंगा अभयारण्यातील दुर्गम शेतशिवारांना आगामी काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

उमरखेड तालुक्याच्या सीमेवर, किनवट शहरालगत पैनगंगा नदीवर तब्बल २०२ कोटी रुपये खर्चून १३ गेटचा उच्च पातळी बंधारा उभारण्यात येत आहे. सध्या गर्डरवर स्लॅब टाकण्याचे काम शिल्लक असून, ते पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गोदावरी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पंकज गावंडे यांनी ही माहिती दिली.

बंधाऱ्याला प्रत्येकी १२ मीटर रुंदीची व सात मीटर उंचीची १३ गेट बसविण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे १०.५७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. १ हजार ५७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे किनवट शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असून, उमरखेड व किनवट तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांनाही रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विशेष म्हणजे, भूमिपूजनानंतर अवघ्या २४० दिवसांत रात्रंदिवस काम करून प्रकल्प अंतिम टप्प्यात आणण्यात आला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सरकारने धरणे व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासंदर्भातील काही अटी शिथिल केल्याने यंदा बंधाऱ्यात पाणीसाठा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभयारण्यातील गावांनाही लाभ

पैनगंगा नदीचा हा भाग किनवट व उमरखेड तालुक्यांच्या सीमेला जोडणारा आहे. नदीकाठचा मोठा परिसर पैनगंगा अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात येतो. या भागातील अनेक गावे व शेतशिवार दुर्गम आहे. पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न दरवर्षी गंभीर बनतो. बंधाऱ्यात पाणी साठल्यास नदीकाठच्या शेतजमिनींना सिंचनाचा आधार मिळण्याबरोबरच या दुर्गम गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प केवळ किनवट शहरापुरता मर्यादित न राहता उमरखेडच्या सीमावर्ती भागासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

यंदा हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत बंधाऱ्याचे उर्वरित काम वेळेत पूर्ण होऊन परतीच्या पावसाचे पाणी अडविणे शक्य झाल्यास दोन्ही तालुक्यांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर गोदावरी पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली कामाला गती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी संचालक जयंत गवळी, अधीक्षक अभियंता सुदाकर कचकलवार आणि कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता पंकज गावंडे व कनिष्ठ अभियंता शिवशंकर डाखोरे हे कामाची प्रगती व गुणवत्ता यावर लक्ष ठेवून आहेत.

दोन्ही तालुक्यांच्या विकासाला चालना

पैनगंगा उच्च पातळी बंधारा हा किनवट तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याचा थेट लाभ उमरखेडच्या सीमावर्ती भागालाही होणार आहे. सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलसंधारणाच्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व मोठे आहे. बंधाऱ्याचे काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकरी, नागरिक तसेच दोन्ही तालुक्यांच्या सीमावर्ती भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार भीमराव केराम व आमदार किसनराव वानखेडे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT