On one hand, there are water cuts; on the other, water is being used excessively at construction sites.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे नांदेडकरांना पाणी बचतीचे आवाहन करून नांदेड मनपा पाणी कपातीचा बडगा उगारत असताना दुसरीकडे मात्र शहरात मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारतींची बांधकामे सुरू असून त्यासाठी पाण्याचा भरमसाठ वापर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाच्या नाकावर चिट्टन पाण्याचा सर्रास दुरुपयोग होत असतानाही प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे राज्य शासनाने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला असून पाण्याची अतिशय गंभीर समस्या निर्माण होत असल्यामुळे पाणी वापराची नियमावली जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील मोठे मध्यम व लघु सिंचन प्रकल्प तळाला गेले आहेत. आतापासूनच पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईच चिंताजनक व भयावह राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाणी बचतीसाठी शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोजेक्स, कन्स्ट्रक्शन वर्क, सी.सी. रोडची कामे यासह खाजगी बांधकामे फ्लॅट्स घरांची बांधकामे न करण्याच्या सूचना मनपाने दिलेल्या आहेत. पाण्याची तीव्र टंचाई असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गोदावरी, येलदरी, जायकवाडीच्या पाणी पाळ्या सुद्धा शेतीसाठी न देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत केवल पिण्याच्या प्राण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी प्रशासनाची ठाम भूमिका आहे. असे असतानाही नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात घरांचे, टोलेजंग इमारतींचे, सी.सी. रोडचे काम चालू असून त्या ठिकाणी दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर होत आहे.
एकीकडे प्रशासनाने गोरगरीबांसाठी नियम राबवणे आणि मोठ-मोठया बिल्डर्स व उद्योजकांना पाणी वापराची मुभा देणे हे कुठपर्यंत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील गणेश टॉकीज परिसर, तरोडा बु., तरोडा खु., कौठा परिसर, नवीन मोंढा, दत्तनगर, आनंदनगर, भाग्यनगर यासह शहरातील अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये बांधकामे सुरू असून पाण्याचा बेसुमार वापर होत असल्याचे दिसन येत आहे.
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या होत्या. सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले होते. याशिवाय काही दिवसांपुर्वीच खासदार अशोक चव्हाण यांनी महापालिकेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना ऑगस्ट २७ पर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बांधकामांवर होणारी पाण्याची नासाडी रोखण्यासाठी मनपा प्रशासन उपाययोजना करणार का?