Narsi Chowk traffic issue file photo
नांदेड

Narsi Chowk traffic issue : वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ‌‘नरसी चौका‌’चा श्वास गुदमरतोय!

स्वतंत्र ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांसह वाहनचालकांतून केली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेब पांडे

नायगाव ः तालुक्यातील नरसी चौक हा दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेला अत्यंत संवेदनशील चौक आहे. मात्र येथे स्वतंत्र ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, सिग्नल व्यवस्था किंवा नियोजनबद्ध वाहतूक नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस येथील वाहतूक समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे या प्रश्नासाठी केवळ स्थानिक पोलिसांना जबाबदार धरण्यापेक्षा या ठिकाणी स्वतंत्र ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांसह वाहनचालकांतून केली जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे चौकातील अनेक व्यापारी, प्रवासी आणि ग्रामीण भागातून येणारे नागरिक प्रचंड त्रस्त झाले. काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये शाब्दिक वादाचे प्रकारही घडल्याचे समजते. दरम्यान, वाहतूक कोंडी झाली की प्रशासन जागे होते; पण कायमस्वरूपी उपाय मात्र होत नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, रविवारी या चौकात तब्बल चार तास वाहतूक कोंडी झालेली बघावयास मिळाली. नांदेड, नायगाव, उमरी, मुखेड, देगलूर, बिलोली तसेच तेलंगणा राज्याकडे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने चौकाला ‌‘वाहतुकीचे रणांगण‌’ स्वरूप प्राप्त झाले होते. वाहनांच्या लांबलचक रांगा, उन्हात अडकलेले प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक,लग्न बिऱ्हाड, आणि रुग्णवाहिका चालक यांचे अक्षरशः हाल झाले.

त्यानंतर दुपारच्या सुमारास मोठ्या वाहनांची संख्या वाढत गेली आणि काही क्षणांतच संपूर्ण चौक जाम झाला. वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी ट्रॅफिक यंत्रणा नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अनेक वाहनचालकांना तासन्‌‍तास जागेवर थांबून राहावे लागले. परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून यावर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवून अतिक्रमण हटवावे...

नरसी चौक परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने संथगतीने जातात आणि त्यामुळेही वाहतूक कोंडी वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरत आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत. नरसी चौकातील वाहतूक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

एसटी बस बाहेर पडण्याचा मार्ग ठरतोय कोंडीचे प्रमुख कारण

स्थानिकांच्या मते, नरसी बसस्थानकातून मुख्य रस्त्यावर बस बाहेर पडण्याचा मार्ग अत्यंत अरुंद आणि अव्यवस्थित असल्याने वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. बस बाहेर पडताच दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी निर्माण होते. त्यानंतर काही मिनिटांत संपूर्ण चौक ठप्प होतो. यासाठी बसस्थानक परिसराचे नव्याने नियोजन करून स्वतंत्र वाहतूक मार्ग निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT