नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका  Pudhari News Network
नांदेड

Nanded municipal politics : स्वीकृत सदस्यपद काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला? नांदेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

स्वीकृत सदस्य पदासाठी नावांची शिफारस करण्याचा अधिकार गटनेता या नात्याने वंचितचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांच्याकडे गेला असून काँग्रेसतर्फे इच्छूक असलेल्यांचे भवितव्य आता त्यांच्या ‌‘हाती‌’ गेले आहे.

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुकांची नावे समोर येत असताना, या पक्षाच्या वाट्यास येणारी एकमेव जागा काँग्रेसच्या दोन स्थानिक नेत्यांनी आगोदरच ‌‘वंचित बहुजन आघाडी‌’स बहाल केल्याचे दिसत आहे.

महानगरपालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या 15 नगरसेवकांनी ‌‘नांदेड लोकन्याय विकासआघाडी‌’ या नावाने गटाची नोंदणी केली आहे. या गटातर्फे स्वीकृत सदस्य पदासाठी नावांची शिफारस करण्याचा अधिकार गटनेता या नात्याने वंचितचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांच्याकडे गेला असून काँग्रेसतर्फे इच्छूक असलेल्यांचे भवितव्य आता त्यांच्या ‌‘हाती‌’ गेले आहे.

मनपा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांच्या चार गटांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आपल्या गटांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने या नोंदणीकृत गटांची माहिती मनपा प्रशासनासह सर्व संबधितांना कळविली असून स्वीकृत सदस्यांच्या निवडीमध्ये गट प्रमुखांची भूमिका महत्त्वाची तसेच निर्णायक राहणार आहे.

ॲड महेश कनकदंडे हे भाजपा- शिवसेना युतीचे गटप्रमुख असून या गटाला संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य पदासाठी 5 नावांची शिफारस करता येईल. अर्थात नावे निश्चित करण्याची बाब भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या कक्षेत असून त्यांनी ठरवलेली नावे आयुक्तांकडे सादर करण्याचा उपचार कनकदंडे पार पाडतील, अशी स्थिती आहे.

काँग्रेस- वंचित आघाडीतर्फे दोन जण स्वीकृत सदस्य होऊ शकतात. त्यात एक जण काँग्रेसचा तर एक वंचितचा असा सर्वसाधारण अंदाज किंवा समज असला, तरी निवडणूक काळात काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी 2 जानेवारी रोजी तयार केलेल्या एका शपथपत्रामुळे वरील दोन पक्षांच्या ‌‘न्याय ‌’ आघाडीत काँग्रेसच्या सर्वच इच्छुकांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वरील शपथपत्राची पार्श्वभूमी अशी की, प्रभाग क्र. 18 (खडकपुरा) मध्ये काँग्रेस पक्षाने चार उमेदवार उभे केल्यानंतर‌‘वंचित ‌’ ने याच प्रभागात एका जागेवर शेख बिलाल शेख रसूल यांना उमेदवारी दिली. पण नंतरच्या घडामोडींमध्ये शेख बिलाल यांना माघार घेण्याच्या बदल्यात काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत सदस्य करण्याची हमी काँग्रेस शहराध्यक्षांनी आपल्या लेटरहेडवर ‌‘ शपथपत्र ‌’ असे नमूद करुन दिली होती. त्यावर संमतीदार म्हणून खा.रवींद्र चव्हाण यांनी स्वाक्षरी केली, असे आता समोर आल्यामुळे स्वीकृत सदस्य पदासाठी काँग्रेसतर्फे अन्य नाव देण्याची पक्षाची संधी डळमळीत झाली आहे.

वरील शपथपत्राबाबत निवडणूक काळात तसेच निकाल लागल्यानंतर काही दिवस गुप्तता पाळली गेली;पण स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आता हे शपथपत्र उघड झाले असून काँग्रेसने आपल्या वाट्याची एक जागा अगोदरच वंचितच्या शेख बिलाल शेख रसूल यांना बहाल केल्याचे मानले जात आहे.

या शपथपत्राबद्दल काँग्रेसच्या एका प्रदेशस्तरीय पदाधिकाऱ्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यावर ‌‘संमती देणार‌’ म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या खासदारांनी मौन बाळगले तर काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना वादग्रस्त शपथपत्राबद्दल जाब विचारल्याचे सांगण्यात येत आहे.

बैठकीत निर्णय होईल- काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या शपथपत्राची माहिती आपल्यापर्यंत आली आहे. पण शपथपत्र देण्या-घेण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो.मनपामध्ये काँग्रेस- वंचित आघाडीने आपल्या गटाची नोंदणी केली आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी ज्या नावांची शिफारस करायची आहे, ती नावे आमच्या गटाच्या बैठकीमध्ये ठेवली जातील व त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. स्थानिक पातळीवर तोडगा निघाला नाही तर आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर जे सांगतील ते आम्ही करू.
प्रशांत इंगोले, गटनेता, नांदेड लोकन्याय विकास आघाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT