संजीव कुळकर्णी
नांदेड ः नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड मंगळवारी झाल्यानंतर सत्ताधारी भाजपामध्ये नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यपदासाठी लगबग, प्रयत्न आणि खटाटोप सुरू झाले आहेत. ‘इच्छुकांची रीघ आणि अर्ज-शिफारशींचे ढीग’ असे या पक्षातल्या अच्छे दिन मधील चित्र आहे.
मनपाच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, अमरनाथ राजूरकर, संघटनमंत्री संजय कौडगे या स्थानिक नेत्यांच्या चमूने भाजपाला घवघवीत यश मिळवून दिल्यामुळे मनपातील पक्षाच्या 45 या संख्याबळाच्या आधारे नामनिर्देशित सदस्यपदासाठी पाच नावांची शिफारस करण्यास वाव असून त्यासाठी पक्षामधील इच्छुकांची संख्या शंभरापर्यंत गेली आहे. खा.चव्हाण यांच्याकडे अनेकांच्या अर्ज-विनंत्या आल्या असल्याची माहिती समोर आली.
मनपा निवडणुकीमध्ये स्वबळावर उतरलेल्या भाजपाकडे वेगवेगळ्या प्रभागांतून पाचशेहून अधिक इच्छूक उमेदवारीसाठी समोर आले होते; पण स्थानिक नेत्यांनी राजकीय कौशल्याने उमेदवारांची निवड करतानाच पक्षामध्ये लक्षणीय बंडखोरी होणार नाही, याची खबरदारीही घेतली. परिणामी अनेक सक्षम, प्रभावशाली व पात्र कार्यकर्त्यांनाही माघार घ्यावी लागली. त्यांच्यातीलच अनेकजण आता स्वीकृत सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत.
खा.चव्हाण यांनी मनपातील भाजपाच्या गटनेतेपदी अनुभवी नगरसेवक ॲड.महेश कनकदंडे यांची जाणीवपूर्वक निवड केली. स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छूक असलेल्यांना कनकदंडे यांच्याकडे अर्ज व आपला स्व-परिचय देण्यास सांगितले गेले आहे; पण अनेकांनी वेगवेगळ्या शिफारशी जोडून खा.चव्हाण यांच्याकडेच आपले अर्ज सादर केले. पक्षाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने आपली पक्षनिष्ठा दाखवून देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले; पण जुन्या नांदेडमधील एका प्रभागातल्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी या कार्यकर्त्याने केलेल्या पक्षविरोधी कामाची लेखी तक्रार केल्याचे सांगण्यात आले.
राजकीय कार्यकर्त्यांशिवाय विविध व्यावसायिक क्षेत्रातील बरेचजण स्वीकृत सदस्य होण्यासाठी इच्छूक आहेत. आतापर्यंत या बिनखर्चाच्या निवडीसाठी ॲड.चैतन्यबापू देशमुख, डॉ.अंकुश देवसरकर, लेखापाल असलेले व्यावसायिक हर्षद शहा, डॉ.रायेवार, डॉ.करुणा जमदाडे, व्यावसायिक बालाजी जाधव, माजी आमदार रातोळीकर यांचे पुत्र संजय पाटील, सुमती व्याहाळकर, उपक्रमशील कार्यकर्ते दिलीप ठाकूर, शिवसेनेची उमेदवारी घेऊन शेवटच्या क्षणी माघार घेणारे महेंद्र पिंपळे, कौडगे यांचे निकटवर्ती आशुतोष जोशी, निष्ठावंत कार्यकर्त्यांतील मोहनसिंह तौर, रामराव केंद्रे, व्यंकटेश साठे तसेच व्यंकट मोकले इत्यादींची नावे समोर आली आहेत.
शहरातील आर्यवैश्य समाजातील प्रमुख व्यक्तींनी खा.चव्हाण यांच्याकडे एक निवेदन सादर केले. मनपातील भाजपाच्या निर्वाचित नगरसेवकांमध्ये या समाजाचा एकही नगरसेवक नसल्यामुळे समाजाला स्वीकृत सदस्यांमध्ये स्थान दिले जावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या समाजातील व्यावसायिक कुणाल कंदकुर्ते हे त्यासाठी प्रयत्नात आहेत. डॉ.सान्वी जेठवाणी यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती; पण त्यांचा विचार झाला नाही. त्या ही इच्छूक आहेत. त्याशिवाय उमेदवारी न मिळालेले अनेकजण प्रयत्नात असल्याचे सांगण्यात आले.
स्वीकृत सदस्यपदासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने कार्यपद्धती निश्चित करून दिली असून त्यात अर्हताही नमूद केली आहे. ही अर्हता तपासून मनपा आयुक्त संबंधितांची निवड स्वीकृत सदस्यपदी करतात. ही प्रक्रिया पुढील काळात होणार आहे. भाजपाकडून कोणाची शिफारस केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांनाही प्रत्येकी एक जणाची शिफारस करता येऊ शकते. काँग्रेसकडेही अनेकजण इच्छूक असले, तरी ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम दरक यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे सांगण्यात आले.