नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका  Pudhari News Network
नांदेड

Nanded municipal corporation : भाजपामध्ये काहींच्या पदरात खूशी; अनेकांच्या वाट्याला ‌‘गम!‌’

स्थायी समितीवर प्रथमच आठ महिलांची निवड ः स्वीकृत सदस्य निवडीत अनेकांची निराशा

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड-वाघाळा शहर मनपाच्या स्थायी, महिला व बालकल्याण या दोन समित्या तसेच स्वीकृत सदस्य पदाकरिता भाजपाच्या सदस्यांची नावे निश्चित करताना पक्षनेते खा.अशोक चव्हाण यांनी काहींच्या पदरात खूशी टाकताना अनेकांना ‌‘गम‌’मध्ये लोटल्याचे बघायला मिळाले.

वरील दोन समित्यांवरील निर्धारित सदस्य तसेच आठ स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी मनपाची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली भरली. या सभेच्या पूर्वसंध्येस खा.चव्हाण यांनी मनपातील भाजपाच्या नगरसेवकांची बैठक शंकरस्मृती इमारतीत घेतली; पण त्यात स्थायी व दुसऱ्या समितीवर पहिल्या फेरीमध्ये कोणाची वर्णी लागणार याचा चव्हाण व त्यांच्या निकटवर्तींनी कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही.

सोमवारी मनपाची सभा सुरू झाल्यानंतर भाजपा-शिवसेना युती आणि अन्य पक्षांच्या गटनेत्यांनी स्थायी तसेच महिला व बालकल्याण समितीसाठी आपापल्या गटांतर्फे निश्चित झालेली नावे महापौरांकडे सादर केल्यावर आणि नंतर ती जाहीर झाल्यावर कोणाला सुखद तर कोणाला दुःखद धक्का बसला. स्थायी समितीवर ज्येष्ठ नगरसेवक वीरेन्द्रसिंघ गाडीवाले यांचे नाव अपेक्षेप्रमाणे आले; पण शहराच्या मध्यवर्ती भागातील काही प्रभागातल्या अनुभवी नगरसेवकांना बाजूला ठेवत चव्हाण यांनी भाजपा-सेना युतीच्या दहा नावांमध्ये चार महिलांसह काही नव्या नगरसेवकांना संधी दिली.

स्थायी समितीवर 16 सदस्य असतात. यात सर्व पक्षांच्या मिळून आठ महिलांचा समावेश झाला आहे. मनपाच्या इतिहासात स्थायी समितीवर एकाचवेळी आठ महिलांची वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. सिडको-हडको भागातील संजय घोगरे यांची स्थायी समितीवर येण्याची इच्छा होती; पण त्यांचे तसेच प्रशांत तिडके, किशोर स्वामी, राजू यन्नम इत्यादी अपेक्षित नावेही भाजपाच्या यादीतून वगळली गेली. विशेष म्हणजे एमआयएमने आपल्या वाट्याच्या तीन जागांमध्ये दोन महिलांना स्थायी समितीत सामावून घेतले. तसेच काँग्रेस-वंचितच्या आघाडीनेही तोच कित्ता गिरवला.

मनपाच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीत 11 जणांची वर्णी लागली. त्यात भाजपा-सेना युतीतर्फे सात जणांना स्थान मिळाले आहे. शिवसेनेच्या नीलम तुलजेश यादव यांनी स्थायी तसेच महिला बालकल्याण समितीत स्थान मिळवत ‌‘दुहेरी मुकुट‌’ प्राप्त केला. प्रभाग क्र.9मध्ये उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या सदिच्छा सोनी पाटील यांना भाजपाने संधी दिली. त्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या दावेदार समजल्या जात आहेत. तसेच सुलोचना काकडे त्यांच्या स्पर्धेमध्ये आहेत.

मनपाच्या स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपामध्ये फार मोठी स्पर्धा, चुरस निर्माण झाली होती. तब्बल दोनशे इच्छुकांची नावे व स्वपरिचय पक्षाकडे प्राप्त झाले होते. त्यातून पाच जणांची निवड करण्याची आव्हानात्मक जबाबदारी पक्षनेत्यांवर होती. वेगवेगळ्या नावांची मागील आठ दिवसांत चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी भाजपाची पाच नावे उघड झाली. भाजपाच्या स्वीकृत सदस्यांमध्ये अमित तेहरा, दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते, डॉ.अंकुश देवसरकर, आशुतोष जोशी आणि सुप्रिया संजय पाटील रातोळीकर यांचा समावेश आहे.

स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांना धक्का बसला. त्यामध्ये प्रामुख्याने व्यंकट मोकले, दिलीप ठाकूर, सुमती व्याहाळकर यांच्यासह भाजपातील अनेक निष्ठावंतांचा समावेश आहे. ठाकूर यांना तर खुद्द खा.चव्हाण यांनी आश्वस्त केले होते. शेवटच्या दहा नावांमध्ये त्यांचे नाव होते; पण शेवटच्या क्षणी पक्षाच्या अन्य एका पदाधिकाऱ्याने आपल्या समर्थकाचे नाव जोरकसपणे रेटल्यामुळे ठाकूर यांचा पत्ता कट झाला.

सुप्रिया पाटील या माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या स्नुषा आहेत. अमित तेहरा यांना वजिराबाद प्रभागात उमेदवारी देता आली नव्हती. त्याची भरपाई पक्षाने केली. दीर्घकाळ मनपात राहिलेले दिलीप कंदकुर्ते यांनी मागील दहा-बारा वर्षांत विधानसभेत धडक मारण्यासाठी तीन प्रयत्न केले; पण शेवटी त्यांना मनपा सभागृहाचाच आश्रय घ्यावा लागला. पक्षाने त्यांच्या मुलाला संधी नाकारली आणि कंदकुर्ते यांना मागच्या दाराने मनपात आणले. यात त्यांचा मोठेपणा नव्हे, तर कमीपणाच समोर आला. डॉ.देवसरकर यांच्या नावाची चर्चा लोकसभा-विधानसभा या निवडणुकांत झाली. तूर्त त्यांचे पुनर्वसन मनपात झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT