विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामामध्ये मनपासह विविध विभागांची यंत्रणा गुंतलेली आहे. या धामधुमीतच येत्या 24 व 25 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या 350व्या स्मृतिदिनाच्या (शहिदी समागम) ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. राज्य शासनाने त्यासाठी महसूल खात्याची यंत्रणा कार्यरत केली असून ज्या मैदानावर हा सोहळा होणार आहे तेथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी श्रमदान करण्यात आले.
वरील सोहळा नांदेड शहराबाहेर असलेल्या असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर शीख धर्माच्या मर्यादा व परंपरांचे पालन करून पार पाडण्यात येणार आहे. मागील काही दिवसांत या सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात सतत बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांनी नांदेडमधील कार्यक्रमात विशेष लक्ष घातले आहे.
मोदी मैदानावर आवश्यक त्या व्यवस्था करताना तेथे दरबार साहिब गुरुद्वाराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांना तेथे पादत्राणे न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात साफसफाईचे काम सुरू झाले आहे. मंगळवारच्या श्रमदानातून या परिसरातील छोटे दगड, खडे व अन्य कचरा वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या श्रमदानात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या श्रमदानात भाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नांदेड हे शीख धर्मीयांचे एक प्रमुख स्थान असल्यामुळे येथे होत असलेल्या शहिदी समागम कार्यक्रमास अनन्य साधारण महत्त्व आहे. यात शीख धर्मासह विविध समुदायांचे भाविकही सहभागी होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.