फरक नेतृत्वातला... बदल नांदेडकरांनी स्वीकारला ! pudhari photo
नांदेड

Nanded Waghala Municipal Election फरक नेतृत्वातला... बदल नांदेडकरांनी स्वीकारला !

खा.अशोक चव्हाण यांना आव्हान देण्याचा ‌‘प्रताप‌’ मतदारांनी पुन्हा नाकारला

पुढारी वृत्तसेवा

संजीव कुळकर्णी

नांदेड ः नांदेड-वाघाळा मनपाच्या मागील म्हणजे 2017 सालच्या निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व तत्कालीन शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडे देण्यात आले; पण शहाण्या नांदेडकरांनी त्यांना साफ साफ नाकारले होते. आता 2026मध्ये भाजपाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते खा.अशोक चव्हाणांकडे आल्यानंतर याच नांदेडकरांनी नेतृत्वातील गुणात्मक फरक ओळखत भाजपाने केलेला नेतृत्वबदल उत्स्फूर्तपणे स्वीकारला. तिसाव्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या नांदेड मनपामध्ये चव्हाणांमुळेच कमळ फुलले आहे.

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे या मोठ्या आणि इतर महानगरपालिकांचे निकाल किंवा तेथील चित्र दुपारी 1 वाजेपर्यंत स्पष्ट झाले असताना नांदेडमधील मतमोजणीची आणि निकाल जाहीर करण्याची गती मात्र खूपच संथ होती; पण दुपारी 4च्या सुमारास बहुमत आवाक्यात आल्यानंतर भाजपाच्या निवडणूक कार्यालयामध्ये ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू झाला. वेगवेगळ्या घोषणा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण शहर दणाणून गेले.

तीन-सव्वातीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मनपामध्ये ‌‘नगरसेवकांचे राज‌’ आणण्यासाठी झालेल्या या निवडणुकीत ‌‘आम्ही जिंकणारच‌’ या दुर्दम्य निर्धारासह भाजपाने पाऊल टाकले. या राजकीय लढाईतील ठळक बाब म्हणजे या मनपावर 24 वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसचे नेतृत्व ज्यांनी केले होते ते अशोक चव्हाण या निवडणुकीत भाजपाचे सर्वेसर्वा होते. पक्षाने सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना ‌‘बघा इकडे; नांदेड माझे‌’च हे खणखणीतपणे सिद्ध करताना त्यांनी आपल्या जुन्या पक्षासह सर्वच विरोधकांना चित केले.

अशोक चव्हाण यांनी भाजपाला म्हणजे आपल्या पक्षाला मिळवून दिलेल्या यशाच्या निमित्ताने नेतृत्व आणि जबाबदारी या दोन्ही बाबी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. भाजपाने मागील निवडणुकीत एकत्रित शिवसेनेसोबत युती केली नव्हती; पण शिवसेनेच्या एका आमदाराकडे आपल्या पक्षाचे नेतृत्व देण्याचा चमत्कारिक निर्णय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर लादला होता. तेव्हाच्या लढाईत काँग्रेस पक्ष भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी होता. निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि चिखलीकर यांनी परिवर्तनाचा नारा दिला; पण त्या निवडणुकीत नांदेडकरांनी ‌‘प्रताप आणि परिवर्तन‌’ नाकारतानाच 81 पैकी 73 जागा अशोक चव्हाण यांच्या पारड्यात टाकल्या होत्या.

नंतरच्या काळात चिखलीकर भाजपात आले, या पक्षाचे खासदार झाले. पुढच्या निवडणुकीत ते पराभूत झाले आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोहा मतदारसंघातून आमदार झाले. मनपाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे तर भाजपाचे खा.चव्हाणांकडे आले. त्यांतून पुन्हा एकदा चव्हाणांचे श्रेष्ठत्व, त्यांचे नेतृत्व आणि त्यांचे कर्तृत्व ठसठशीतपणे सिद्ध झाले. मागील 20 वर्षांतल्या राजकारणात आ.चिखलीकर यांनी जेव्हा जेव्हा अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध अशा निवडणुकांत दंड थोपटले तेव्हा तेव्हा त्यांच्यावर आपटी खाण्याची नामुष्की ओढवली.

मनपाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करताना चिखलीकर यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात ‌‘नांदेडचा कारभारी बदला; राष्ट्रवादीला संधी द्या‌’ अशी साद नांदेडकरांना घातली; पण 81 पैकी बहुतांश जागांवर त्यांना सक्षम उमेदवार देता आले नाहीत. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या एका गटाशी युती करण्याचा प्रयोगही त्यांनी केला; पण मतदारांनी हे सर्व प्रयोग नाकारत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. निवडणुकीच्या निमित्ताने आ.चिखलीकर, शिवसेनेचे आ.हेमंत पाटील, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण या साऱ्यांनीच आपल्या प्रचारामध्ये चव्हाणांना लक्ष्य केले, तरी त्यात त्यांना यश आले नाही.

गेल्या निवडणुकीत भाजपाने शहरभर लावलेल्या फलकांवर ‌‘मिशन 51 प्लस‌’ हा आकडा झळकला होता; पण मतदारांनी या पक्षाची केवळ सहा जागांवर बोळवण केली होती. या निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यापूर्वी खा.अशोक चव्हाण यांनी प्राथमिक बैठकीमध्ये 50 जागा निवडून आणण्याचा मनोदय व्यक्त केला होता. या पक्षाने आपल्या चिन्हावर 67 जागा लढवून चाळीसहून अधिक जागा जिंकल्या आहेत. मनपाच्या पहिल्या निवडणुकीत भाजपाला 7 जागा मिळाल्या. 2002मध्ये 6 तर 2007मध्ये 3 आणि 2012मध्ये या पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्या. 2017 साली भाजपाचे संख्याबळ 6 वर राहिले. या पक्षाला आजवर कोणत्याही निवडणुकीत मनपामध्ये दोन आकडी संख्याबळ पार करता आले नव्हते. अशोक चव्हाण भाजपात येण्यापूर्वी नांदेडमध्ये या पक्षाकडे शक्तिस्थानच नव्हते; पण खा.चव्हाण यांनी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडमधील पक्षाचे बळ वाढवतानाच पक्षामधील आपले बळही वाढविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT