Truck hits Motorcycles Umri Nanded
उमरी: उमरी तालुक्यातील मंडाळा गावाजवळील राज्य रस्त्यावर एका भरधाव येणाऱ्या ट्रकने दोन दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका दुचाकी वरील एक महिला जागीच ठार झाली. अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती उमरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. चंदापुरे यांनी दिली. हा अपघात बुधवारी (दि.१४) दुपारी दोनच्या सुमारास घडला. अंजनाबाई दशरथ सावंत (वय ३५, रा. तुराटी, ता. उमरी, जि. नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, उमरी तालुक्यातील जामगाव येथील एक विवाह सोहळा आटोपून तुराटी गावाकडे जात असलेल्या आणि चिकना येथील एका दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. त्यात अंजनाबाई सावंत ही महिला जागीच ठार झाली. तर योगेश दत्ता भंडारे (रा. चिकना), रावसाहेब लिंगराम सावंत (वय ४०) , जयश्री रावसाहेब सावंत (वय ३८, दोघेही रा. तुराटी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळतात पोलीस अधिकारी, कर्मचारी, मुकुंद पाटील, दिलीप पाटील सावंत, गोविंद पाटील, शंकर वाघे, शंकर पाटील यांच्यासह गावातील अनेकांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तत्काळ उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.