Umri Sindhi Road Tanker Bike Collision
उमरी : पाण्याच्या उभ्या टँकरवर दुचाकी धडकली. या धडकेत दुचाकी वरील दहा वर्षाच्या मुलीसह तिचे वडील गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उमरी सिंधी रस्त्यावर घडली. दोघांनाही पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमरी तालुक्यातील सिंधी येथील जीवनाजी मारोती बट्टेवाड (वय ३५) आणि त्यांची दहा वर्षाची मुलगी नव्या बट्टेवाड हे दोघेही दुचाकीवरून उमरीकडे येत होते. यावेळी उमरी सिंधी रस्त्यावरील एका उभ्या पाण्याच्या टँकरला दुचाकीची जोराची धडक बसली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत ते रस्त्यावर पडले. याच रस्त्याने मुदखेड येथील नगरसेवक उपेंद्र देवदे जात होते. दोघांनाही त्यांनी आपल्या कारमधून उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉ. एम. एम. चंदापुरे यांनी दोघांवरही प्राथमिक उपचार करून दोघेही गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले आहे.