उमरी: पुढारी वृत्तसेवा : उमरी येथील सोयाबीन शासकीय केंद्रावर हमालीचे काम करून दुचाकीवरुन आपल्या गावी परतणाऱ्या हुंडा (तांडा) येथील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 7:30 च्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हुंडा (तांडा) येथील हमाली व्यवसाय करणारे विट्ठल मोतीराम राठोड (वय 53), अरविंद सुभाष जाधव (वय 30) उमरी शहराबाहेरील सोयाबीन शासकीय केंद्रात काम करतात. नेहमीप्रमाणे ते काम आटोपून रात्री आपल्या दुचाकीवरुन हुंडा (तांडा) येथे परतत होते. यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला उडवून फरफटत नेले. घटनास्थळावरील लोकांनी आरडाओरड करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुसाट असल्याने ते वाहन अंधाराचा फायदा घेत निघून गेले. नागरिकांनी जखमींना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तत्पूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्याभारती यांनी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने मृत घोषित केले.
आज दोघांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हुंडा(तांडा) येथील सरपंच रोहिदास बाबुसिंग राठोड यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.