Umarkhed Murli Bandhara Murder Update
उमरखेड : तालुक्यातील बिटरगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मुरली बंधाऱ्यालगत मारोती गंगाराम डुकरे (वय ६०, रा. जलदरा, ता. किनवट) यांची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकून दिल्याप्रकरणी पोलीस तपासाला गती मिळाली आहे. या प्रकरणातील २ संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या खून प्रकरणात मृताची पत्नी पार्वताबाई मारोती डुकरे व मुलगा प्रदीप मारोती डुकरे यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ५) आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली.
मृतदेह कपड्यांवर सिमेंटचे पोते बांधून सहस्रकुंड बंधाऱ्याजवळ फेकण्यात आला होता. सदर मृतदेहाचा शोध घेत पोलिसांनी सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील जलदरा गाव गाठत तपास केला. अखेर गुरुवारी दुपारी मृताची ओळख पटवून खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले.
तपासादरम्यान आरोपी प्रदीप डुकरे याने नेहमी होणाऱ्या वादाला कंटाळून वडिलांच्या डोक्यात लाकडी पाट मारल्याचे समोर आले आहे. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याची खात्री करून मृतदेह झाकून ठेवण्यात आला. संशय येऊ नये म्हणून मृतदेह घरातून ओढत नेऊन मोटरसायकल ला बांधुन एका गाठोड्यात बंधाऱ्याजवळ फेकण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे करीत आहेत.