Umarkhed molestation case
उमरखेड : शहरातील खडकपुरा परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भर बाजाराच्या दिवशी घडली. या प्रकारानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही कपडे प्रेस करण्यासाठी आरोपी ज्ञानेश्वर विश्वनाथ मोकळे (वय २०, महात्मा फुले वार्ड) यांच्या दुकानात गेली होती. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वरसोबत शेख जाहीद शेख मुक्तार (वय २३, काझीपूरा वार्ड) आणि सय्यद जैयद अली (वय २२, जामा मस्जिद वार्ड) या दोघांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत छेडछाड केली आणि शारीरिक इजा केली.
मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी आरोपींच्या पालकांकडे याबाबत तक्रार केली. याचा राग मनात धरून दुसऱ्याच दिवशी आरोपी तिघे पुन्हा दुकानाजवळ आले आणि मोटारसायकलवरून मुलीवर झेप घेत तिच्या पोटावर आणि हातावर तीक्ष्ण शस्त्राने ओरखडे काढले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी आज (दि. १३) पहाटे ४.५४ वाजता अटक केली. त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्याखालील कलम १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड करीत असून, अटक कारवाई पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या पथकाने केली.
घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी मुलींच्या छेडछाडीची आणखी एक घटना घडल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून त्या प्रकरणातही फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू आहे.