हरीश हरणे Pudhari
नांदेड

Nanded Drowning | गणेश विसर्जनावेळी तरुणाचा पैनगंगेत बुडून मृत्यू; ५ जणांना वाचविण्यात यश

मौजे बारा येथील दुर्घटना; एनडीआरएफ पथकाने बाहेर काढला मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

Ganesh Visarjan Painganga River Drowning Incident

उमरखेड : अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी पैनगंगा नदीपात्रात गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील मौजे बारा येथे घडली. हरीश पुंडलिक हरणे (वय १७, रा. मौजे बारा, ता. उमरखेड) असे मृत युवकाचे नाव आहे.

अनंत चतुर्दशीनिमित्त बारा येथील काही तरुण घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी पैनगंगा नदीपात्रात गेले होते. गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू असताना चार ते पाच तरुणांचा नदीपात्रातील पाण्यात पाय घसरला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला. त्यावेळी सोबत असलेल्या नागरिकांनी तत्परता दाखवत पाण्यात पडलेल्या चार-पाच तरुणांना बाहेर काढले.

मात्र, हरीश हरणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकानेही शोधमोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर हरीशचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या उत्साहावर या दुर्घटनेने विरजण पडले. हरीशच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच बारा गावावर शोककळा पसरली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT