नरेंद्र येरावार
उमरी: हैदराबाद विभागातील सिकंदराबाद–निजामाबाद दरम्यान मुसळधार पावसाचा फटका बसला असून, गुरुवारी (२८ ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. भिकनुर–तळमडला व अक्कणपेठ–मेडक लोहमार्गावर पाणी साचल्याने रुळाखालून पाणी गेले. बुधवारी सकाळपासून बंद असलेला मार्ग गुरुवारी सायंकाळपर्यंतही सुरळीत झाला नाही. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल झाले.
भर पावसातही रेल्वे कर्मचारी दुरुस्तीचे काम सुरू ठेवत होते, मात्र संततधार पावसामुळे अडथळे निर्माण झाले. "पाऊस पूर्ण थांबून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील रेल्वे सेवा सुरू होणार नाही", असे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
निजामाबाद–नांदेड सवारी गाडी, कृष्णा एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, रायचूर एक्सप्रेस या गाड्याही गुरुवारी (दि.२८) रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातून शहराकडे जाणाऱ्या अनेकांना प्रवास न करता परतावे लागले.
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मराठवाड्यात बुधवारी सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारीही कायम होता. त्यामुळे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने शुक्रवार (२९ ऑगस्ट) रोजीही काही रेल्वे रद्द राहणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
काचीगुडा–नगरसोल (17661), काचीगुडा–नरखेड (17641), नांदेड–मेडचल (77606)
काचीगुडा–नगरसोल (07055), काचीगुडा–पूर्णा (77605)
निजामाबाद–तिरुपती रॉयल सीमा एक्सप्रेस (12794) अंशतः रद्द
नांदेड–विशाखापट्टणम (20812) नांदेड–चारलापल्ली दरम्यान रद्द
नगरसोल–काचीगुडा (07056) शुक्रवारपर्यंत रद्द
देवगिरी एक्सप्रेस (17057/17058) – नांदेड–करीमनगर–काजीपेट मार्गे
अमरावती–तिरुपती (12766) – परभणी, परळी, विकाराबाद, काचीगुडा मार्गे
नरखेड–काचीगुडा एक्सप्रेस (17642) – परभणी, विकाराबाद मार्गे
नगरसोल–काचीगुडा (17662) – परभणीतून पुढे वळवली
भगत की कोठी–काचीगुडा विशेष (17660) – निजामाबाद, करीमनगर मार्गे