उमरी : तालुक्यातील तळेगाव ते मनूर हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता. या रस्त्याच्या कामात राजकारण घुसले होते. आंदोलने झाली, उपोषणे झाली, प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. अखेर प्रशासनाने दखल घेतली आणि हा रस्ता मोकळा करून दिला.
प्रशासनाने बुधवारी (दि.20) घटनास्थळावर जाऊन सदरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे ताब्यात देऊन कामाला सुरुवात केली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतल्याने गावकऱ्यांच्या वतीने समाधान व्यक्त केल्या जात आहे. तळेगाव ते मनुर रस्ता (ग्रामीण मार्ग क्रमांक 48) बुधवारी सबंधित यंत्रणा व तालुका प्रशासन यांच्यावतीने सदरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे ताब्यात देऊन कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत, नायब तहसीलदार संजय सोलंकर, पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे आणि गटविकास अधिकारी मांजरमकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकवाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शिंदे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधी भिसे व हिवरे, मंडळ अधिकारी रामेश्वर भिंगोरे, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग श्रीरामवार तसेच बालचंद कदम आणि प्रभू खानसोळे या महसूल अधिकाऱ्यांचा समावेश होता. यासोबतच दीपक दराडे, सचिन जाधव, महसूल सेवक राठोड, कमळे, मोईस, हनवते, जहागीरदार आणि वाहन चालक रईस शेख व माधव क्षीरसागर या महसूल कर्मचाऱ्यांनीही उपस्थिती लावली. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, उद्योजक मारोतराव कवळे, दत्तात्रय देशमुख, हर्षवर्धन देशमुख, पोलीस पाटील भिंगे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.