हिमायतनगर: अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊन जमिनी खरडून गेल्या आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले असून एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे.
या परिस्थितीतही तलाठी यांनी शंभर टक्के नुकसान होऊन देखील पन्नास टक्के नुकसान दाखवून अहवाल सादर केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असुन, अशा अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा अन्यथा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी सज्जामध्ये असलेल्या अनेक गावांमधील अतिवृष्टीमुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे नाल्या काटासह शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून या शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे कृषी अधिकार्यासह तलाठी यांनी केले होते. परंतु तलाठ्यांनी शासनाकडून मिळालेले क्षेत्र शंभर टक्के असताना देखील ते क्षेत्र 55 ते 60 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान दाखवून शासनाकडे अहवाल पाठविला आहे. त्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तुटपुंची मदत जाहीर झाली.
शासनाने दिलेल्या क्षेत्रांमध्ये देखील तलाठ्याने जाणीवपूर्वक नुकसान क्षेत्र कमी दाखवून शेतकऱ्यावर अन्याय केला. सदरील तलाठ्यांना निलंबित करून कार्यवाही करावी अशी मागणी सिबदरा येथील शेतकऱ्यांनी निवेदनद्वारे तहसीलदार यांच्याकडे शुक्रवारी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बोरगडी सज्जाचे तलाठी थळंगे यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असुन अशा अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही या सज्जातील कारला, सिबदरा, बोरगडी येथील सर्व शेतकरी बांधव आपल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अशा बेजबाबदार तलाठ्यावर प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे लक्ष लागून आहे.