नायगाव: तालुक्यातील टाकळी (बु) या गावात रविवारच्या दिवशी भूगर्भातून येणारा गूढ आवाज अन् जाणवलेल्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि. 12) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एकूण चार वेळा मोठे आवाज झाले आणि जमीन हादरल्याची घटना घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवले. प्रशासनाने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर (National Centre for Seismology) तपासणी केली, मात्र या भूगर्भीय हालचालींची कोणतीही नोंद आढळली नाही. या घटनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि आवाजाचे नेमके कारण शोधण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 'अर्थ सायन्स' विभागातील प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घाबरून न जाता सतर्क राहावे.
घरांवरील पत्रांच्या छतावरील दगड तातडीने काढून टाकावेत आणि पत्रे बोल्टने घट्ट बसवावीत.
पुन्हा आवाज आल्यास त्वरित घराबाहेर मोकळ्या जागेत जमावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
तातडीच्या मदतीसाठी (02462) 235077 या जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या क्रमांकावर संपर्क साधावा.