Nanded SIR voter verification 
नांदेड

Nanded SIR voter verification-नांदेडमध्ये एसआयआर मोहिमेला आला वेग

Nanded SIR voter verification-२७.७७ लाख मतदारांची घराघरांत पडताळणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एस आय आर २०२६ मोहिमेला वेग आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील २७ लाख ७७ हजार ७३ मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ३ हजार ८८ बूथ लेव्हल अधिकारी (बी एल ओ) घराघरांत जाऊन प्रत्येक मतदाराकडून गणना अर्ज भरून घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. मतदारांच्या जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रांची यादीही निश्चित करण्यात आली आहे.

१ जुलै १९८७ पूर्वी जन्म झालेल्या मतदारांना स्वतःचा जन्माचा पुरावा सादर करावा लागणार आहे. तर त्यानंतर जन्मलेल्या मतदारांना स्वतःबरोबरच आवश्यकतेनुसार आई वडिलांच्या जन्मासंदर्भातील कागदपत्रेही सादर करावी लागू शकतात. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, शासकीय ओळखपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

या मोहिमेनंतर ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सर्व पडताळणी पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ९ मतदार नोंदणी अधिकारी, २० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १० हजार ९०९ बूथ लेव्हल एजंट (बी एल ए) कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणताही अपात्र व्यक्त्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये, यासाठी प्रत्येकाने बीएलओ यांना आवश्यक सहकार्य करून गणना अर्ज वेळेत भरावा. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT