Nanded Sand tipper hits school bus
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मुदखेड शहरातील युनिव्हर्सल शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शालेय बसवर अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर धडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवास करणारे ४० शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी मुदखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुदखेड तालुक्यात शंखतीर्थ व वासरी या गोदावरी घाटातून वारेमाप वाळूचा उपसा सुरू असल्याने रात्रभर उपसलेली वाळू पहाटे तीननंतर हदगाव, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्यात विविध रस्त्याने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर आणि हायवा सुसाट धावत सुटतात. अशाच प्रकारचे शंखतीर्थ येथील नृसिंह कृपेच्या आशीर्वादाचे २६ ११६८ वाळूची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या टिप्परने उभ्या असलेल्या युनिव्हर्सल शाळेच्या बसला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ४० विद्यार्थी मात्र बालंबाल वाचल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.