गोदावरी पात्रात ऑपरेशन क्रूक डाऊन; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त pudhari photo
नांदेड

illegal sand mining : गोदावरी पात्रात ऑपरेशन क्रूक डाऊन; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळू माफियांवर पोलिसांचा छापा;

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत मोठी कारवाई केली. कल्लाळ शिवारात टाकलेल्या या छाप्यात 54 तराफे, 6 इंजिने आणि रेतीसह एकूण 51 लाख 24 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच पाच आरोपी पसार झाले असून, एका मुख्य संशयितासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत सर्व पोलीस ठाण्यांना कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कल्लाळ शिवारातील गोदावरी नदी पात्रात काही जण बेकायदेशीररीत्या रेतीचा उपसा करून साठा करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजेच्या सुमारास पथकाने पंचासह नदी पात्रात छापा टाकला. पोलिसांना पाहताच पाच आरोपींनी तेथून पळ काढला. घटनास्थळावरून जप्त केलेले साहित्य आणणे कठीण असल्याने, पोलिसांनी 54 तराफे आणि इंजिने जागीच तोडून व जाळून नष्ट केली. तसेच नदीकाठी साठवलेली 10 ब्रास रेती जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. ही सामग्री बाबाराव शिरसागर (रा. कल्लाळ) आणि त्याच्या इतर साथीदारांची असल्याचे तपासात समोर आले आहे.

या पथकाची कारवाई

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, विष्णू कल्याणकर, संतोष पवार, आसिफ अली आणि गर्वेद्र सिरमलवार यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

असा आहे जप्त मुद्देमाल

तराफे : 54 नग (किंमत 27 लाख रुपये)

इंजिन : 6 नग (किंमत 18 लाख रुपये)

रेती : 110 ब्रास (किंमत 5 लाख 50 हजार रुपये)

इतर साहित्य : लोखंडी ड्रम, पाईप, खोरे व टोपली (किंमत 74,300 रुपये)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT