RTO Employee Agitation
नवीन नांदेड : विविध प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा १६ जूनपासून बेमुदत संप सुरू असून संपाच्या दुसऱ्या दिवशी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाला नांदेड जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरमवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या मागण्या रास्त असून शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडत नसतानाही त्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी केली. पाठिंबा देण्यासाठी मध्यवर्ती संघटनेचे साले व सरोदे उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी या ३२ पदांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, कार्यालय अधीक्षक पदाचे सेवाप्रवेश नियम तयार करणे, सहाय्यक मोटार वाहन अभियंता पदासाठी आवश्यक सेवानियम तयार करणे, वर्ग-३ संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम निश्चित करणे, लिपिक टंकलेखक व वरिष्ठ लिपिक या पदांची नावे अनुक्रमे ‘परिवहन सहाय्यक’ व ‘वरिष्ठ परिवहन सहाय्यक’ अशी बदलणे तसेच आश्वसित प्रगती योजना (ACP/MACP) अंतर्गत वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक कर्मचाऱ्यांना सेवा लाभ देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
यावेळी आर. एन. गोरे, एस. आर. केंद्रे, आर. एल. गाजुलवाड, जी. एम. शिंदे, आर. एच. कंधारकर, जी. के. पवळे, एन. आर. देवडे, दिलीप गाडचेलवार, पी. पी. सातपुते, पी. जी. मरवाळे, रवी सानप, ए. एस. केंद्रे, एम. डी. पोकले, एन. जी. कुंडगीर, एस. जी. कोंगलवार, भगीरथ ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.