नांदेड : नांदेड विभागातील दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे संपत्तीच्या संरक्षणासाठी राबवलेल्या विशेष मोहिमांमध्ये मोठे यश संपादन केले आहे. ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन रेल सुरक्षा, ऑपरेशन नन्हे फरिश्ते या अंतर्गत गेल्या दोन दिवसांत विविध महत्त्वपूर्ण कारवाया करण्यात आल्या आहेत.
धावत्या ट्रेनमधील चेन स्नॅचिंगचा उलगडा
7 मार्च रोजी नांदेड-हडपसर एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर स्थानकावर एका महिलेची सोन्याची साखळी चोरीला गेली होती. आरपीएफ, सीआयबी आणि जीआरपीने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 43,700 रुपये किमतीची 17.57 ग्र्ॅम सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
दरोड्याचा कट उधळला
8 मार्च रोजी पिंगळी स्थानकाजवळ प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना संयुक्त पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल, दोन दुचाकी आणि तीन धारदार शस्त्रे असा एकूण 1.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच परभणी स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका व्यक्तीलाही रंगेहाथ पकडण्यात आले. या यशस्वी कारवायांमुळे नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा दलाची सतर्कता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून, प्रवाशांनी आरपीएफच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
ऑपरेशन रेल्वे सुरक्षा
अकोला स्थानकावर रेल्वेची सिग्नलिंग केबल कापणाऱ्या दोन चोरट्यांना आरपीएफने अटक केली. त्यांच्याकडून 10 मीटर केबल आणि चोरीची साधने जप्त करून रेल्वे संपत्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते
छत्रपती संभाजीनगर स्थानकावर घरातून पळून आलेल्या 17 वर्षीय मुलाची आरपीएफने सुटका केली. योग्य समुपदेशन करून या मुलाला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.