Ransugav Nilegavan area leopard
नायगाव : कुष्णूर एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाला जखमी करून पसार झालेला बिबट्या पुन्हा नायगाव तालुक्यात अवतरल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२२) उघडकीस आली आहे. रानसुगाव-निळेगव्हाण शिवारात दिवसाढवळ्या फिरणाऱ्या या बिबट्याने रावसाहेब संभाजी जाधव यांच्या शेतातील गाईच्या कालवडीचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास संभाजी सुरेश जाधव (रा. निळेगव्हाण) यांच्या शेतात हा बिबट्या दिसून आला. अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे घाबरलेल्या जाधव यांनी साहस दाखवत ओरड केल्याने बिबट्या पळाल्याचे दिसणारा व्हिडीओ त्यांनी काढला असून शेतकऱ्यांचा जीवावर बेतलेला हा प्रसंग व्हिडीओमध्ये स्पष्ट जाणवतो आहे.
ही घटना समोर आल्यानंतर रानसुगाव,घुंगराळा,तलबीड,हिपरगा परिसरात खळबळ उडाली. वनरक्षक गजानन कोटलवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची पुष्टी केली. बिबट्याचा वाढलेला मुक्काम लक्षात घेता वनविभागाने जागोजागी कॅमेरे बसविणे, तसेच शेतकरी व गावकऱ्यांना स्पीकरद्वारे सूचना देण्याची मोहीम राबवली आहे.
“सुमारे एक महिन्यापासून एमआयडीसी, दरेगाव, तलबीड, मांजरम परिसरात बिबट्याचा मुक्काम असल्याचा अंदाज आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे,” अशी माहिती वनरक्षक कोटलवार यांनी दिली.
शेतकरी संभाजी जाधव म्हणाले, “बिबट्यापासून माझे अंतर केवळ तीनशे मीटर होते. जीव मुठीत घेऊन कुत्र्याला हाका मारल्यावर तो पळून गेला. इतका मोठा प्राणी असूनही तो भित्रा असल्याचे दिसून आले.”
वनविभागाकडून शेतकऱ्यांना रात्री जनावरे बाहेर न ठेवणे, दिवसा शिवारात फिरताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.